पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना नुकतीच जाहीर करण्यात आली. महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेतील काही प्रभागांमध्ये बदल करून अंतिम प्रभागरचना करण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांची ताकद असलेल्या काही प्रभागांमध्ये बदल करून पवार यांना खुश करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांमध्ये काही बदल करून दिलासा देण्यात आला आहे. राज्यात महायुतीमध्ये सत्ताधारी असलेल्या आणि भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रभागरचना केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मित्रपक्ष असतानाही शहरातील ज्या प्रभागात उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद अधिक आहे, त्या प्रभागांचीही तोडफोड करून रचना करण्यात आल्याचा आरोप होता. महापालिकेच्या प्रभागरचनेवर भाजपचेच वर्चस्व असल्याचे अंतिम प्रभाग रचनेवरून स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रारूप प्रभागरचनेवर जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्राबल्य असलेल्या खडकवासला, वडगाव शेरी आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांतील काही प्रभागांमध्ये अंशत: बदल करून ‘राष्ट्रवादी’चे समाधान करण्यात आले आहे.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ज्या भागातून राष्ट्रवादीच्या तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले, तो भाग तोडून दुसऱ्या प्रभागात जोडून या दोन्ही पक्षांवर भाजपने कुरघोडी केली होती. या प्रकारानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अंतिम प्रभागरचना करताना हरकती, सूचनांचा आधार घेऊन हडपसर, खडकवासला, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील काही प्रभागात बदल करण्यात आले आहेत.
मध्यवर्ती पेठांमधील हरकती, सूचनांकडे दुर्लक्ष
शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या भागात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. येथील प्रभागरचना भाजपला फायद्याची ठरेल, अशी करण्यात आली आहे. मात्र, हे करताना आरक्षणात बदल होईल, अशा पद्धतीने ठरावीक भाग तोडून दुसऱ्या प्रभागात जोडला आहे. कसबा, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये हा प्रकार करण्यात आला आहे. त्यावर हरकती नोंदविण्यात आल्या. मात्र, अंतिम प्रभागरचनेत मध्यवर्ती पेठांच्या प्रभागांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.