जीवनशैलीत झालेले ‘आधुनिक’ बदल थेट वंध्यत्वालाच कारणीभूत ठरत असून, देशपातळीवर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ३१ ते ४० या वयोगटातील तब्बल ४६ टक्के जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या असल्याचे समोर आले आहे, तर २१ ते ३० या वयोगटातील ३४ टक्के जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे.
इंडियन सोसायटीज ऑफ असिस्टेड रीप्रॉडक्शन (आयएसएआर), एशिया पॅसिफिक इनिशिएटिव्ह ऑन रीप्रॉडक्शन (अॅस्पायर) आणि मेरेक सिरोनो या कंपनीतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. देशातील नऊ शहरांमधील २५६२ व्यक्तींनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. यात मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, आग्रा, हैद्राबाद, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, कोची या शहरांचा समावेश होता.
बदललेल्या जीवनशैलीत वाढलेला मद्यपान व धूम्रपानाचा वापर तसेच एकूणच बदललेले वातावरण आणि वाढते प्रदूषण या गोष्टी वंध्यत्वासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरत असल्याचे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. योग्य वयात विवाह न करणे, मूल हवे असल्याचा निर्णय घेण्यास उशीर लावणे अशा कारणांबरोबरच एकाहून अधिक जोडीदारांशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची वृत्तीही वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकत असल्याचे मतही या तज्ज्ञांनी मांडले आहे.
मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील वंध्यत्व उपचार केंद्राचे संचालक डॉ. ऋषिकेश पै म्हणाले, ‘‘वंध्यत्वाची समस्या असणाऱ्या ४१ टक्के पुरूषांमध्ये वंध्यत्वाचे कारण शुक्राणूंच्या कमी संख्येशी निगडित आहे. तर ४० टक्के स्त्रियांमध्ये ‘पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज’ (पीसीओडी) हे वंध्यत्वाचे कारण ठरले आहे. दर दहा जोडप्यांपैकी एक जोडपे वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करत असते.’’
३१ ते ४० या वयोगटातील ४९ टक्के जोडप्यांनी आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) म्हणजेच कृत्रिम गर्भधारणेचा प्रयत्न केल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. विशेष म्हणजे ही उपचारपद्धती वापरून पाहणाऱ्या २१ ते ३० या वयोगटातील जोडप्यांचे प्रमाणही मोठे आहे. या वयोगटात ३५ टक्के जोडपी आयव्हीएफचा पर्याय निवडत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.
वंध्यत्वाची संभाव्य कारणे-
– धूम्रपान, मद्यपान, इतर व्यसने
– व्यायामाचा अभाव
– मानसिक ताणतणाव
– उशिरा विवाह
– अपत्यप्राप्तीचा निर्णय उशिरा घेणे
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2013 रोजी प्रकाशित
बदलती जीवनशैली ठरतेय वंध्यत्वाला जबाबदार!
‘पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज’ (पीसीओडी) हे वंध्यत्वाचे कारण ठरले आहे. दर दहा जोडप्यांपैकी एक जोडपे वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करत असते.

First published on: 27-09-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changing lifestyle is responsible for impotence