एका शासकीय अधिकाऱ्याच्या संवेदनेमुळे आणि या अधिकाऱ्याने घेतलेल्या समाजहिताच्या निर्णयामुळे पुण्यातील दोन आणि लातूर येथील एक अशा तीन सेवाभावी संस्थांना तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घेतेलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे सेवाभावी संस्थांना मोठा निधी प्राप्त झाला आहे.
लोणावळा येथील बाई भिकाजी जहांगीर मोदी पारशी सॅनेटोरियम ट्रस्टची मिळकत विक्री करण्यासंबंधीच्या प्रक्रियेत पुण्याचे धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी हा आदेश दिला आहे. त्यांनी घेतेलेल्या भूमिकेमुळे तीन संस्थांना प्रत्येकी ५० लाखांचा निधी मिळेल. लोणावळा येथील या न्यासाची जागा विकण्यासाठी न्यासाने जाहीर नोटीस देऊन निविदा मागवल्या होत्या. त्यात सहा कोटी ९३ लाख रुपये ही सर्वाधिक रक्कम देऊ केलेल्या निविदाधारकास जागा देण्याचे ठरले. त्यानंतर न्यासाने धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीसाठी अर्ज सादर केला होता. मात्र, हा अर्ज तीन वर्षे विविध कारणांमुळे निर्णयाअभावी प्रलंबित राहिला. सहधर्मादाय आयुक्त डिगे यांच्यापुढे हा अर्ज आल्यानंतर त्यांनी या जागेची किंमत आता वाढली असेल, ही बाब लक्षात आणून देत भाववाढ झाल्याचे गृहीत धरून पुन्हा निविदा मागवल्या.
पुन्हा निविदा मागवल्यानंतर त्याच जागेसाठी आठ कोटी ३० लाख रुपये देण्याची तयारी एका खरेदीदाराने दर्शवली. जागेच्या विक्रीतून येणारी वाढीव किंमत लक्षात घेऊन हा न्यास इतर संस्थांना काही आर्थिक मदत करू शकेल का, अशी विचारणा डिगे यांनी केली. त्यावर न्यासानेही तशी तयारी दर्शवली आणि येणाऱ्या जास्तीच्या रकमेतून न्यासाने तीन अन्य संस्थांना प्रत्येकी ५० लाख अशी दीड कोटींची मदत देण्याबाबत एकमत झाले. त्यावर मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाच्या इतिहासात प्रथमच असे आदेश देण्यात आले, की येणाऱ्या विक्री रकमेतून तीन सार्वजनिक न्यासांना प्रत्येकी ५० लाखांची मदत देण्यात यावी. बाई भिकाजी जहांगीर मोदी पारशी सॅनेटोरियम ट्रस्टतर्फे अॅड. सागर थावरे यांनी या प्रक्रियेत प्रथमपासून काम पाहिले आणि पुण्यातील सेवाभावी संस्थांच्या कार्याची माहितीही अॅड. थावरे यांनी सहधर्मादाय आयुक्तांना दिली. त्यानुसार आर्थिक मदत देण्यासाठी संस्थांची निवड करण्यात आली.
मदत कोणाकोणाला.. ?
– समाजाने नाकारलेल्या एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणारी लातूर येथील सेवालय संस्था
– पुण्यातील हिराबाई कोवाजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट यांच्यातर्फे आर्थिक दुर्बल घटकातील स्त्रियांमधील कुपोषण दूर करण्याचा प्रकल्प
– देवदासींच्या मुलांचे शिक्षण व विकासासाठी चालवली जाणारी पुण्यातील एकलव्य बालशिक्षण संस्था
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2015 रोजी प्रकाशित
शासकीय अधिकाऱ्याच्या संवेदनेमुळे तीन सेवाभावी संस्थांना दीड कोटीचा निधी
धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घेतेलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे सेवाभावी संस्थांना मोठा निधी प्राप्त झाला आहे.
First published on: 06-02-2015 at 03:23 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charity fund parsi trust