आजारी असलेल्या आजोबांसारखा पेहराव करून दुसऱ्याचा एका व्यक्तीकडून साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र तयार करून घेत त्याद्वारे वडिलोपार्जित १४ गुंठे जमीन खरेदी केल्याप्रकरणी नातवासह आणखी दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी याबाबतचे आदेश दिले. नातू कुणाल सुनिल हरगुडे, शंतनू रोहिदास नरके, कृतिका किरण कहाणे अशी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आजोबा असल्याचे भासवणाऱ्या तोतया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शाेध घेण्यात येत आहे. याबाबत ४२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ही घटना घडली होती.

हेही वाचा >>> पुणे : पीएच.डी.बरोबरच दुसऱ्या पदवी अभ्यासक्रमास परवानगी नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी हरगुडे, नरके, कहाणे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी विरोध केला. संबंधित गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आजोबा म्हणून भासवणाऱ्या तोतया व्यक्तीचा शोध घ्यायचा असून त्याला अटक करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती ॲड. घोरपडे यांनी युक्तीवादात केली. फिर्यादीकडून ॲड. तेजस पवार आणि ॲड. विक्रम घोरपडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.