पुणे : शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांना खोटी माहिती असलेली कागदपत्रे सादर करून परवाना मिळवल्याप्रकरणी वैष्णवी हगवणेचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणे यांविरोधात वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर हगवणे बंधूंविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. याबाबत कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी फिर्याद दिली आहे.
हगवणे बंधूंनी शस्त्र परवाने मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत खोटी माहिती दिली होती. खोट्या माहितीच्या आधारे त्यांनी शस्त्र परवाना मिळविला होता. शस्त्र परवाना मिळवताना दोघांनी दिलेल्या माहितीत विसंगती असल्याचे चौकशीत उघड झाले. या माहितीची शहानिशा करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
पती शशांक, दीर सुशील, तसेच नीलेश चव्हाण यांनी २०२२ मध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळविले होते. तिघांचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शशांक आणि सुशील हगवणे यांनी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुण्यातील निवासाचा पत्ता दिला. या दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात शस्त्र परवाना मिळण्यासाठी अर्ज केले होते. वास्तव्याचा पुरावा म्हणून दोघांनी भाडेकरार शस्त्र परवान्यासाठी पोलिसांना दिले. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.