त्रयस्थ यंत्रणेमार्फत लोकमानस जाणण्याचा उपक्रम
राज्य शासनाच्या कामगिरीबद्दल जनतेमध्ये नेमकी काय चर्चा आहे, सरकारबद्दल जनतेचे मत काय आहे, लोकांना शासनाचा अनुभव कसा येत आहे, या विषयीची माहिती थेट मुख्यमंत्र्यांना कळवण्यासाठी राज्यात साडेतीनशे ‘मुख्यमंत्री मित्र’ नियुक्त केले जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या यंत्रणेपासून चार हात दूरच ठेवण्यात आले असून, भाजपशी संबंध नसलेल्या पण फडणवीस सरकारबद्दल सहानुभूती असलेल्यांची नियुक्ती ‘मुख्यमंत्री मित्र’ या प्रयोगात केली जात आहे.
राज्यात होत असलेल्या नगरपालिकांच्या तसेच त्यानंतर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून ‘मुख्यमंत्री मित्र’ या नावाने होत असलेला प्रयोग हा त्या तयारीचाच एक भाग आहे. सरकारच्या कामगिरीबद्दल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून कठोर परीक्षण होत नाही. मंत्री वा मुख्यमंत्र्यांसमोर सरकारच्या कामगिरीचे चांगले चित्र पदाधिकाऱ्यांकडून रंगवले जाते. मात्र वस्तुस्थिती खरोखरच तशी आहे का हे तपासण्यासाठी ‘मुख्यमंत्री मित्र’चा प्रयोग भाजप करत आहे. पक्षाशी संबंधित नसलेल्यांची निवड त्यासाठी केली जात असून प्राध्यापक, महिला डॉक्टर, निवृत्त शासकीय अधिकारी, माजी सैनिक, युवक आदींचा समावेश या प्रयोगात केला जात आहे.
या प्रयोगाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्य़ात दहा ते पंधरा ‘मुख्यमंत्री मित्रां’ची नियुक्ती केली जाणार आहे. हे काम कशा पद्धतीने करायचे याचे प्रशिक्षणही त्यांना दिले जाणार आहे. निवड झालेल्या सर्वाना ‘मुख्यमंत्री मित्र’ असे ओळखपत्रही दिले जाणार असून त्यांनी त्यांच्या कामाचा अहवाल तसेच त्यांची मते, शासकीय यंत्रणेबाबत नागरिकांना येत असलेले अनुभव या संबंधीची माहिती थेट मुख्यमंत्र्यांना कळवायची आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर थेट संपर्क करण्यासाठी नियुक्त केलेल्या सर्वाना स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

‘मुख्यमंत्री मित्रां’कडून जी माहिती येईल त्या माहितीची दखल मुख्यमंत्री घेणार असून हे काम बिगर शासकीय यंत्रणेमार्फत पार पाडले जाईल. ‘मुख्यमंत्री मित्र’ म्हणून जे काम करू इच्छितात त्यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत. आलेल्या अर्जाची छाननी करून या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून इच्छुकांची मुलाखत घेतली जात आहे आणि त्यानंतर योग्य व्यक्तीची नियुक्ती केली जात आहे. पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांच्या प. महाराष्ट्रातील दौऱ्यात अशा काही मुलाखती पार पडल्या.
– रविकिरण साने, माध्यम प्रमुख, भाजप (वॉर रूम), पुणे विभाग