पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून आठवडय़ापूर्वी एका मजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या आठ महिन्यांच्या बालिकेचे अज्ञात महिलेकडून अपहरण करण्यात आले. अपहरण करणाऱ्या महिलेला पुणे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले खरे, पण महिला कोणत्या दिशेने गेली याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले नाहीत. लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला. तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसर, कर्वे रस्ता, वारजे या भागातून महिलेने रिक्षाने प्रवास केल्याची माहिती सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आली. ही माहितीदेखील रिक्षाचालकांच्या चौकशीतून मिळाली. गेले आठ दिवस लोहमार्ग पोलिसांनी अहोरात्र तपास करून आठ महिन्यांच्या चिमुकलीला आईच्या ताब्यात दिले. बालिका परत मिळाल्यानंतर तिच्या आईला अश्रू आवरता आले नाहीत. तेव्हा केलेल्या अहोरात्र तपासाचे फळ मिळाले, अशी भावना पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली.
सोलापूर जिल्हय़ातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या आंदेवाडी गावात राहणारी लक्ष्मी गेनसिद्ध चाबुकस्वार, पती आणि आठ महिन्यांच्या मुलीसोबत शहरात कामाच्या शोधात आले होते. काही दिवस त्यांनी एके ठिकाणी काम केले. पण काम न पटल्यामुळे त्यांनी पुन्हा मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात चाबुकस्वार दाम्पत्य आले. दोन दिवस तेथे ते वास्तव्यास होते. आडोशाला आठ महिन्यांच्या मुलीला घेऊन ते राहात होते. रंजना जगन्नाथ पांचाळ उर्फ अनुष्का रवींद्र रणपिसे (वय ४२) हिची नजर आठ महिन्यांच्या मुलीकडे गेली. तिने चाबुकस्वार दाम्पत्याशी ओळख वाढवली. रंजना पांचाळचा पहिला विवाह झाला आहे. तिला दोन मुले आहेत, मात्र पहिल्या पतीसोबत तिचा वाद झाल्यानंतर ती विभक्त झाली. त्यानंतर एके ठिकाणी ती काम करत होती. तेथे रवींद्र रणपिसे याच्याशी ओळख झाली. रंजनाने अविवाहित असल्याची बतावणी रवींद्रकडे केली. दरम्यान, रंजनाला पहिल्या पतीपासून दोन अपत्ये झाल्यानंतर तिने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे तिला गर्भधारणा होऊ शकत नव्हती. दरम्यान, रवींद्रने तिच्याकडे संततिप्राप्तीसाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनंतर तिने गर्भधारणा झाल्याची बतावणी त्याच्याकडे केली आणि बाळंतपणासाठी माहेरी जाते, असे सांगून ती बाहेर पडली. जाताना तिने रवींद्रकडून वीस हजार रुपये घेतले होते.
त्यानंतर रंजना दोन दिवस पुणे स्टेशन परिसरात दोन दिवस थांबली. त्याच वेळी रेल्वे स्थानकाच्या आवारात थांबलेल्या चाबुकस्वार दाम्पत्य आणि त्यांच्या आठ महिन्यांचा मुलीवर रंजनाची नजर पडली. तिने चाबुकस्वार दाम्पत्याशी ओळख वाढवली. मुलीला तिने कपडे आणून दिले. ५ फेब्रुवारी रोजी तिने चाबुकस्वार यांच्या मुलीला पळवून नेण्याची योजना आखली. रंजनाने तिच्या भाच्याला रेल्वे स्थानक परिसरात बोलावून घेतले. चाबुकस्वार यांना जेवायला घेऊन जा, असे तिने सांगितले. रंजनाने मुलीला स्वत:कडे ठेवले. त्यानंतर भाचा रेल्वे स्थानकासमोर असलेल्या एका उपाहारगृहात त्यांना घेऊन गेला. त्यांना जेवायला घातले आणि त्यांचे लक्ष चुकवून पसार झाला, तेव्हा चाबुकस्वार दाम्पत्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि त्यांनी रेल्वे स्थानक गाठले. तोपर्यंत रंजना चाबुकस्वार यांच्या मुलीला घेऊन पसार झाली होती. घाबरलेल्या चाबुकस्वार यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी तातडीने या गुन्हय़ाचा छडा लावण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल दबडे आणि पथकाने लगोलग रेल्वे स्थानकाच्या आवारात धाव घेतली. चाबुकस्वार दाम्पत्याने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांकडून शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. रेल्वे स्थानकाचे आवार तसेच प्रवेशद्वारालगत असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले. तपासाबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक अनिल दबडे म्हणाले, सीसीटीव्ही चित्रीकरणात रंजना तिच्यासोबत असलेल्या मुलीला घेऊन स्थानकातून बाहेर पडली, मात्र नेमक्या कोणत्या प्रवेशद्वाराने ती बाहेर पडली, हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे पोलिसांकडून रेल्वे स्थानकातील प्रत्येक प्रवेशद्वाराबाहेर लावलेले चित्रीकरण पडताळण्यात येत होते. स्थानकातील कर्मचारी, हमाल, रिक्षाचालक यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. तिचे छायाचित्र त्यांना दाखविण्यात आले. ताडीवाला रस्त्यालगत असलेल्या रिक्षा थांब्याच्या परिसरातील रिक्षाचालकांकडे चौकशी करण्यात आली तेव्हा ५ फेब्रुवारी रोजी एक महिला, लहान मुलीसोबत आली होती. तिने रिक्षा वारज्याच्या दिशेने नेण्यास सांगितले होते, अशी उपयुक्त माहिती एका रिक्षाचालकाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वारजे माळवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून पडताळण्यास सुरुवात करण्यात आली. कर्वे रस्ता, कोथरूड या भागातील चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले. अखेर वारजे उड्डाणपुलानजीक रंजना मुलीला घेऊन एका रिक्षातून उतरल्याचे चित्रीकरणात आढळून आले. तेथून रिक्षाने ती उत्तमनगरच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर उत्तमनगरच्या दिशेने गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध सुरू करण्यात आला. चित्रीकरणात त्या रिक्षाच्या जाळीवर नक्षीकाम करण्यात आले होते. पोलिसांनी त्या रिक्षाचा शोध सुरू केला. वारजे, गणपती माथा, उत्तमनगर भागातील रिक्षाचालकांची चौकशी करण्यात आली.
अखेर नक्षीदार जाळी असलेल्या रिक्षाचालकाचा पत्ता पोलिसांना शोधून काढण्यात यश आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार रंजनाला उत्तमनगर भागात सोडण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ज्या गल्लीत तिला सोडण्यात आले होते, तेथील रहिवाशांकडे चौकशी करण्यात आली तेव्हा रंजना ५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या नातेवाईक संगीता नांदुस्कर हिच्याकडे आल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी नांदुस्करला तपासासाठी ताब्यात घेतले, तेव्हा रंजना वाल्हेकरवाडी भागात राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक वाल्हेकरवाडी भागात सोमवारी (१२ फेब्रुवारी) पोहोचले आणि रंजनाला ताब्यात घेण्यात आले. तिच्या ताब्यात असलेल्या मुलीला घेऊन पोलीस पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आले आणि चाबुकस्वार दाम्पत्याच्या ताब्यात मुलीला सोपविण्यात आले. चाबुकस्वार दाम्पत्याच्या ताब्यात मुलीला सोपविण्यात आल्यानंतर त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. गेले आठ दिवस पोलिसांनी अहोरात्र तपास केला. मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेचा माग काढण्यात अनेक अडथळे आले, पण सहायक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक बबनराव गायकवाड, विष्णू गोसावी, भोसले, धनंजय दुगाणे, प्रशांत डोईफोडे, अनिल दांगट, प्रभा बनसोडे, जनार्दन गर्जे, सुनील कदम, आनंद कांबळे, स्वप्नील कुंजीर, राजेश कोकाटे, विक्रम मधे, तुषार गेंगजे, पवन बोराटे, जयमाला कांबळे, अश्विनी येवले, मनीषा बेरड, जगदीश, दिलीप खोत यांनी चिकाटीने तपास करून अपहरण प्रकरणाचा उलगडा केला, असे पोलीस निरीक्षक दबडे यांनी सांगितले.
rahul.khaladkar@expressindia.com
