मिश्कील टिपण्णीच्या माध्यमातून सर्वाना हसविणारा खेळकर चिंटू आता ‘चिंटू गँग’द्वारे दिनदर्शिकेमध्ये अवतरला आहे. खास मुलांसाठी निर्मिती करण्यात आलेल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंगळवारी (१७ जून) ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ‘चिंटू’चे निर्माते चारुहास पंडित यांच्या हस्ते होणार आहे.
‘चिंटू’चे निर्माते आणि प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर वाडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून स्वानंदी प्रकाशन आणि गंगोत्री ग्रीनबिल्ड यांनी या दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे सायंकाळी साडेसहा वाजता दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मकरंद केळकर आणि चारुहास पंडित यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
चारुहास पंडित म्हणाले, ‘चिंटू’ची दिनदर्शिका करावी याविषयी प्रभाकर याच्याशी बोलणे झाले होते. मकरंद केळकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, आता हे प्रकाशन होत असताना प्रभाकर आपल्यामध्ये नाही याचे दु:ख आहे. प्रभाकरच्या अकल्पित निधनामुळे खंडित झालेली चिंटू ही मालिका आता फेसबुकरून सुरू करण्यात आली असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.