पुणे : बीड, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगरमधील ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात गेले दीड वर्ष फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या फरार संचालक अर्चना सुरेश कुटे, आशा पद्माकर पाटोदेकर (पाटील) यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीआयडी) पुण्यातून अटक केली. बाणेर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
‘बीड, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगरमधील ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास छत्रपती संभाजीनगर येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात संचालक मंडळाविरुद्ध ९५ गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर संचालक अर्चना कुटे, आशा पाटोदेकर या पसार झाल्या होत्या. गेले दीड वर्ष त्या पसार होत्या. त्यांच्या मागावर सीआय़डीचे पथक होते. कुटे आणि पाटोदेकर या बाणेर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआयडीच्या पथकाने त्यांना अटक केली,’ अशी मााहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.
अर्चना कुटे हिच्याकडून ८०लाख ९० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने, ५६ लाख ७५ हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू, दागिने, ६३ लाखांची रोकड, दहा लाखांचे वाहन असा दोन कोटी दहा लाख ७५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात १३ संचालकांपैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक अमोल गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधीक्षक किरण पाटील, उपअधीक्षक स्वाती थोरात, पोलीस निरीक्षक विजय पणदे, कारभारी गाडेकर, देवचंद घुणावत, सय्यद रफीक यांनी ही कारवाई केली.