पुणे : आकर्षक रोषणाईने सजलेल्या मंदिरांबाहेर रात्रभर सुरू असलेली भजनांची मालिका, विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले वारकरी, टाळ-मृदंगांच्या ठेक्यावर फेर धरून वैष्णवजनांनी शनिवारी भक्तिरसाची अनुभूती घेताना जागतिक संगीत दिन साजरा केला. निवडुंगा विठोबा मंदिर आणि पालखी विठ्ठल मंदिर येथे पालखीच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. भोजनव्यवस्था, चहापान, अंगमर्दन अशा विविध प्रकारांनी वारकऱ्यांच्या सेवेमध्ये दंग असलेल्या कार्यकर्त्यांच्या लगबगीने मध्य पुण्यामध्ये जणू पंढरी अवतरली होती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी (२२ जून) सासवड आणि लोणी काळभोरकडे मार्गक्रमण होणार आहे.

विठ्ठलाप्रती असलेली भक्ती, प्रेम आणि जिव्हाळा या समान धाग्यातून एकत्र आलेल्या वारकऱ्यांमुळे मध्यवर्ती पुण्यातील वातावरण जणू विठ्ठलमय झाल्याची अनुभूती मिळाली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने संध्याकाळपर्यंत विश्रांती घेतल्याने भाविकांना विनासायास पालखीचे दर्शन घेता आले.
शहरात शनिवारी पहाटेपासूनच सगळीकडे वारकरी सेवेची लगबग सुरू झाली. वारकऱ्यांचा मुक्काम असलेल्या भागात स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी सेवा कार्य केले. अनेकांनी वारकऱ्यांना घरी जेवणासाठी आमंत्रण दिले. काहींनी त्यांना वारीच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक वस्तू भेट दिल्या. वारकऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांबरोबर फुगड्यांचे फेर धरत, रिंगण करून नाचत पुणेकर वारकरी झाले होते. शहरात विविध ठिकाणी वारकरी बंधूंनी भोजनाचा आस्वाद घेतला.

पालखीचे दर्शन घेण्यासाठी लहान मुलांसह ज्येष्ठांची दिवसभर भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात वर्दळ होती. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर दर्शनासाठी आले होते. पालखी मुक्कामाच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पालखी सोहळ्याचे आज मार्गक्रमण गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात चैतन्याचे वातावरण घेऊन आलेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (२२ जून) पुण्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. पहाटे आरती करून दोन्ही पालख्या हडपसरपर्यंत एकत्रित मार्गक्रमण करतील. संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने जाणार असून, लोणी काळभोर येथे पालखीचा मुक्काम असेल. तर, हडपसरपासून उजवीकडे वळून मार्गस्थ होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे.

क्षणचित्रे

कोकणस्थ परिवाराच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील नेवरेकर लंच होम येथे वारकऱ्यांसाठी मोफत मोबाइल रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली हाेती. गेल्या दहा वर्षांपासून ही सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेलंगण येथील निजामबाद येथून अंकुश पवार हे गौसेवक गेल्या पाच वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. हा भक्तिमार्ग मला ‘रिचार्ज’ करतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले.