पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोल्हे हे महागद्दार असल्याचा आरोप मोहिते यांनी केला. त्यावर महागाईने जनता, शेतकरी त्रस्त असताना कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी वाहायची, याला महागद्दारी म्हणतात, असे प्रत्युत्तर डॉ. कोल्हे यांनी दिले.

खेड विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दौरा केला. त्यावेळी आमदार मोहिते यांनी हा गद्दार तो गद्दार म्हणणारे डॉ. अमोल कोल्हे स्वत: महागद्दार आहेत. कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी जर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले असते, तर कांदा आणि दुधाचा प्रश्न कधीच मार्गी लागला असता, अशी टीका केली. आढळराव पाटील यांनी रस्ते, महामार्ग, बैलगाडा शर्यतीच्या परवानगीसाठी तसेच अन्य केलेली कामेच कोल्हे यांनी त्यांच्या कार्यअहवालात दाखविली आहेत. कामांचे श्रेय लाटणे म्हणजे एक प्रकारची चोरीच नाही का, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – पुण्यात मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार… पण मनसेच्या नेत्यांनी ठेवली ‘ही’ अट

हेही वाचा – पुण्यात आज प्रचाराची रणधुमाळी; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याला खासदार डॉ. कोल्हे यांनीही आक्रमकणे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मोहिते यांच्या वयाचा, अनुभवाचा मान ठेवून प्रामाणिकपणे सांगतो की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम भाजपने केले आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी ८३ टक्के सुशिक्षितांना बेरोजगार केले, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप मंत्र्यांचा पोरगा चिरडतो, पेट्रोल शंभरीपार तर गॅस हजारच्या पार जातो. याला गद्दारी म्हणतात. ही गद्दारी उघड्या डोळ्याने दिसत असतानासुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी वाहायची, याला महागद्दारी म्हणतात. इतिहासातील हंबीरराव मोहिते खंबीर होते. हे मोहिते महागद्दार आहेत. केवळ कुठल्यातरी कारवाईपासून वाचण्यासाठी महागद्दारीचा आरोप करण्याची लाचारी वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, अशी माझी भावना आहे.