निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.तर शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात येत असताना. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या निकालानंतर राज्यभरात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहेत. पुण्यातही दोन्ही गटामध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे.

हेही वाचा- ‘भलेही धनुष्य हिरावून घ्याल, पण मनुष्य आजही मातोश्रीसोबत’; पुण्यात शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे आंदोलन

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांचे कार्यकर्ते आमनेसामने येत आहेत. पुण्यात एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते शनिवारी एकत्र आले होते. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे नवी पेठेतील गांजवे चौक परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीदेखील झाली.

हेही वाचा- “ठाकरेंनी धनुष्यबाण राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता” म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आरशासमोर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले यांच्यासह पदाधिकारी आले. त्यावेळी ते पत्रकार संघातील आतील बाजूस कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत होते. त्याच दरम्यान ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ५० खोके एकदम ओके,गद्दार अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकाराचा वाद होऊ नये हे लक्षात घेता केवळ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यां सोबत कार्यक्रम सुरू करण्यात आला.मात्र तरी देखील ठाकरे गटाचे कार्यकर्ते ५० खोके एकदम ओके आणि गद्दारच्या घोषणा सुरू राहिल्या. अखेर शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी देखील घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तेवढ्यात पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली.