पुणे : पुण्यातील अभय व मनश्री अगरवाल या दाम्पत्याने ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’ या आरोग्य एटीएमची सुरुवात केली आहे. या आरोग्य एटीएमद्वारे केवळ १० मिनिटांत कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेअंतर्गत ६५ हून अधिक आरोग्य चाचण्या करणे शक्य असून त्याचे अहवालही तातडीने उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या आरोग्य एटीएमद्वारे ग्रामीण भागात टेलीमेडिसिनचा अधिक प्रभावीपणे वापर आगामी काळात शक्य होणार आहे.
याबाबत आरोग्य एटीएम या संकल्पनेचे जनक आणि ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’चे संस्थापक व मुख्याधिकारी अभय अगरवाल म्हणाले की, ग्रामीण भारतात अद्याप अपेक्षित असलेली आरोग्य यंत्रणा पोहोचलेली दिसत नाही. अनेक ठिकाणी डॉक्टर असले तरी त्यांना आवश्यक चाचण्या करण्याची सुविधा सहज उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी सुविधा असली तरी चाचण्यांचे अहवाल लगेच उपलब्ध होत नसल्याने तातडीने निदान शक्य होत नाही.
या पार्श्वभूमीवर ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’ या संकल्पनेद्वारे आम्ही हे आरोग्य एटीएम उपलब्ध करून दिले असून याद्वारे केवळ १० मिनिटांत रुग्णाच्या आजाराचे निदान करणाऱ्या ६५ हून अधिक चाचण्या करता येणार आहेत. यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर करण्यात आल्याने या चाचण्यांचे परिणाम हे ९५ टक्क्यांहून अधिक अचूक असून ते तातडीने उपलब्ध होत आहेत.
देशात १५० हून अधिक शहरांत तसेच ७ देशांमध्ये ३ हजारांहून अधिक आरोग्य एटीएम कार्यरत असून ८० लाखांहून अधिक रुग्णांनी आजवर त्याचा वापर केला आहे. या आरोग्य एटीएमचा वापर हा ग्रामीण भागात सरकारी, खासगी रुग्णालये, दवाखाने, आशा सेविका यांच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे. हे यंत्र भाडेतत्त्वावर अथवा मासिक हप्त्यावर विकत घेता येऊ शकत असल्याने ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते, असे आरोग्य एटीएमच्या वितरण व्यवस्थेचे महाराष्ट्रातील काम पाहणाऱ्या डायनाब्लेझ कंपनीचे अजय ढुमणे यांनी स्पष्ट केले.
चाचण्यांसाठी खर्चही कमी
पॅथलॅबमध्ये ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये खर्च येणाऱ्या चाचण्या आरोग्य एटीएमद्वारे ५०० ते १ हजार ५०० रुपयांत करता येतात. आरोग्य एटीएम वीज आणि इंटरनेट याशिवाय कार्यरत राहत असून यामध्ये १९ प्राथमिक चाचण्यांसह हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन, एचबीएवनसी, मानसिक आरोग्य, फुफ्फुसांशी संबंधित विकार, डोळ्यांची तपासणी, कान, दात, त्वचा, मूत्रपिंड यांच्याशी संबंधित चाचण्या होऊ शकणार आहेत.
याबरोबरच डेंग्यू, हिवताप, करोना, एचआयव्ही, विषमज्वर, चिकुनगुन्या यांसाठीच्या विकारांच्या रॅपिड चाचण्या करणेही शक्य आहे, असे ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’च्या सहसंस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका मनश्री अगरवाल यांनी सांगितले.