पुणे : डिजिटल काळात ग्रंथ, पुस्तकांचे काय होईल याचे उत्तर तरुण पिढी, पुस्तक महोत्सव देत आहे. समाजात सृजनशीलता असेपर्यंत पुस्तके, वाचनसंस्कृती मरणार नाही. समाजाला सृजनशील ठेवण्यासाठी, मूल्ये टिकण्यासाठी वाचनसंस्कृती टिकणे महत्त्वाचे आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. तसेच पुणे पुस्तक महोत्सव इतका चांगला आहे म्हणूनच ‘मी पुन्हा येईन,’ ‘दरवर्षी येईन’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे आचार्य पवन त्रिपाठी, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे, लोकमान्य मल्टिपर्पज कॉ-ऑप सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, डॉ. सोमनाथ पाटील, विशाल चोरडिया, कृष्णकुमार गोयल, संयोजन समिती सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात एकाच लेखकाच्या सर्वाधिक पुस्तकांचे प्रदर्शन याचा गिनेस विश्वविक्रम परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुरिश्वर महाराज यांच्या नावे नोंदवला गेला. या विक्रमाचे प्रमाणपत्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हेही वाचा >>> मी सगळ नीट करणार, कोणालाही सोडणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

फडणवीस म्हणाले, ‘पुस्तक महोत्सवासाठी पुण्यापेक्षा उपयुक्त दुसरे शहर नाही. पुणेकर ज्ञान, पुस्तकांसाठी उत्साहित आहेत हे या महोत्सवाने दाखवून दिले आहे. ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम येत्या काळात महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न करता येईल. पुस्तक महोत्सव महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आयोजित केला जाईल. विचारांची मेजवानी सर्वत्र पोहोचली पाहिजे.’

हेही वाचा >>> गुंडाकडून दोन पिस्तूले, सहा काडतुसे जप्त; बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात कारवाई

‘इतिहासात ग्रंथांचे महत्त्व मोठे आहे. आपले ज्ञान किती प्रगाढ, सखोल होते याचे उदाहरण नालंदा विद्यापीठ आहे. जगातील सर्वांत मोठे असलेल्या विद्यापीठात कलेपासून शल्यचिकित्सेपर्यंतचा अभ्यास केला जात होता. बख्तियार खिलजीने विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळण्याचा प्रयत्न केल्यावर ती आग तीन महिने जळत होती. चहुदिशांनी येणारे ज्ञान घेतले पाहिजे हे आपली संस्कृती सांगते. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विचारांचे संकलन करू शकते, सृजन करू शकत नाही. सृजनासाठी मानवी बुद्धिमत्ताच लागते. तंत्रज्ञान ज्ञानाचे नवे दालन उघडून देते. तंत्रज्ञानामुळे कोणत्याही भाषांतील पुस्तके सहजपणे अनुवाद होऊन वाचता येतात,’ असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुस्तक महोत्सवासमोर खाद्य महोत्सवही सुरू असतो. त्यासाठीही कधीतरी वेळ ठेवा, असे फडणवीस यांनी सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. पुस्तक महोत्सव ही पुण्याची गरज होती. पुस्तकांवर मराठी माणसांचे प्रेम आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदाचा महोत्सव तिप्पट मोठा आहे. लहान मुलांसाठी चित्रपट महोत्सव, साहित्य महोत्सव असे विविध कार्यक्रम होणार आहेत, असे पांडे यांनी सांगितले.