कोणालाही आपल्या शेजारी कचरा डेपो नको आहे, त्यामुळे हा विषय आला की त्याला विरोध होतो. जर कुठेच कचरा डेपो करायचा नाही, तर मग तो कचरा परदेशात निर्यात करायचा का, असा प्रश्न मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरीत बोलताना केला. चाकणचा नियोजित विमानतळ व मोशीतील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र हे प्रकल्प राज्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत, असे ते म्हणाले.
चिखलीतील घरकुल प्रकल्पातील घरांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. तेव्हा राज्यातील कचरा डेपोच्या गंभीर समस्येवर त्यांनी नेमकेपणाने बोट ठेवले व सहकार्य करण्याचे आवाहन सर्वाना केले. केंद्रीय गृहनिर्माणमंत्री गिरिजा व्यास, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शिवाजीराव आढळराव, गजानन बाबर, आमदार विलास लांडे, महापौर मोहिनी लांडे आदी या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कचरा डेपोचा प्रश्न गंभीर आहे. राज्यात सगळीकडे ही समस्या भेडसावते आहे. कोणालाही आपल्याजवळ डेपो नको आहे. मग तो कुठे करायचा, परदेशात जायचे का? आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच दरुगधीचा त्रास होणार नाही, असे तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्रात अत्याधुनिक कचरा डेपो करावे लागतील. त्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे, अन्यथा आपल्या विकासावर मर्यादा येतील. देशातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन केंद्र मोशीत उभारले जात असून ७४१ कोटींचा पहिला टप्पा लवकर सुरू होईल. सर्व त्या परवानगी देण्यात आली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार असून त्या आराखडय़ावर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. या प्रकल्पास निश्चितपणे उशीर झाला, दोन वर्षे लागली. आता अडचणी दूर झाल्याने वेगाने काम होईल. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे चाकणचे विमानतळ. पुण्याचे विमानतळ संरक्षण खात्याचे असून हवाई दलाकरिता त्याचा वापर वाढत चालला आहे. काही वर्षांनंतर आपल्याला ते वापरता येणार नाही. पर्यायी विमानतळ आवश्यक आहे. त्यासाठी चाकणला दोन धावपट्टय़ांचे आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचे असून आयुक्त, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, आमची तयारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2013 रोजी प्रकाशित
…तर, तो कचरा परदेशात निर्यात करायचा का? – मुख्यमंत्री
कोणालाही आपल्या शेजारी कचरा डेपो नको आहे, त्यामुळे हा विषय आला की त्याला विरोध होतो. जर कुठेच कचरा डेपो करायचा नाही, तर मग तो कचरा परदेशात निर्यात करायचा का?
First published on: 24-12-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm prithviraj chavan garbage depot ncp congress airport