पुणे : अभियांत्रिकी शिक्षणाला संशोधनाची नवी दिशा देण्यासाठी सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाकडून (सीओईपीटीयू) चिखली येथे संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलाला आयआयटी मुंबईचे उपकेंद्र करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवी प्रदान समारंभात पाटील बोलत होते. सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू डॉ. सुनिल भिरुड, टाटा ऑटो-कॉम्प सिस्टीम्सचे उपाध्यक्ष अरविंद गोयल, कुलसचिव डी. एन. सोनावणे उपस्थित होते. या समारंभात ३५८ पदव्युत्तर विद्यार्थी (२७१ एम.टेक. व ८७ एमबीए) ; तसेच ७२५ पदवीधर विद्यार्थी यांना पदवी प्रमाणपत्रे, ९ पदवीधर विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
पाटील म्हणाले, सीओईपीच्या चिखली येथील संकुलाद्वारे केवळ संशोधनावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या संकुलातून संशोधन पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईकडून पदवी प्रदान करता येईल का, या अनुषंगाने केंद्र सरकार, आयआयटी मुंबई प्रशासनाशी चर्चा चालू आहे. पुण्यात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये असल्याने नवीन आयआयटी सुरू करण्यास परवानगी मिळणे अवघड आहे. मात्र, आयआयएमनंतर आता आयआयटी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे चिखली संकुलालाच आयआयटीचे उपकेंद्र म्हणून दर्जा मिळवण्याची शक्यता तपासली जात आहे.
त्यासाठी आयआयटी संचालक शिरीष केदारें यांच्यासह सीओईपीचे अधिकारी चर्चा करत आहेत. सुरुवातीला काही अभ्यासक्रम, प्रकल्पांची देवाणघेवाण होणार आहे. केंद्र सरकारच्या पातळीवरही या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास तयार आहे.
‘विद्यार्थी भारतात शिक्षण घेऊनही परदेशी विद्यापीठाचे पदवीधर होतात. त्याच धर्तीवर चिखली केंद्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटीची पदवी मिळावी, हा प्रयत्न आहे. या पदवी आयआयटीकडून स्वतंत्र दिली जाईल की संयुक्त (आयआयटी-सीओईपी) स्वरूपात दिली जाईल, हे अद्याप ठरलेले नाही. सीओईपी विद्यापीठाच्या पुण्यातील मुख्य इमारतीत नियमितपणे पदवी, पदव्युत्तर व इतर अभ्यासक्रम सुरू राहतील,’ असेही पाटील यांनी सांगितले.
विकसित भारत २०४७ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ८ टक्के विकास दर आवश्यक असल्याचे आहे. विद्यार्थी, तरुण व्यावसायिकांनी नावीन्य, कल्पकता, प्रामाणिकतेद्वारे देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलावा. येत्या दोन दशकांत डिजिटल, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांमुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडतील, असे आवाहन गोयल यांनी नमूद केले.
