पुणे : उद्योग आणि शिक्षण संस्था यांना जोडणारा उपक्रम ‘सीओईपी’ तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि बजाज ऑटो यांनी हाती घेतला आहे. त्या अंतर्गत ‘सीओईपी’मध्ये ‘बजाज इंजिनीअरिंग स्किल्स ट्रेनिंग’ (बेस्ट) या केंद्राची स्थापना करण्यात येणार असून, त्या अंतर्गत इलेक्ट्रिक मोबिलिटी, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम इलेक्ट्रॉनिक्स प्री कम्प्लायन्स हे अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत.
‘सीओईपी’ने याबाबतची माहिती दिली. ‘सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ’ आणि ‘बजाज ऑटो’ यांच्यात कौशल्यविकास उपक्रमासाठी करार करण्यात आला. या वेळी ‘सीओईपी’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे, नियामक मंडळ सदस्य अनुप साबळे, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. सुरेश परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन खेर, ‘बजाज ऑटो’च्या सीएसआर विभागाचे उपाध्यक्ष सुधाकर गुडिपाटी, कौशल्य विभागाचे प्रमुख रमेश व्ही, डॉ. श्रीनिवास महाजन या वेळी उपस्थित होते.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘बेस्ट’ या केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘बजाज ऑटो’तर्फे १३ कोटी रुपयांची गुंतवणूक करून सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठात प्रयोगशाळांसह ‘बेस्ट’ केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.
‘उदयोन्मुख तंत्रज्ञान शिक्षणात प्रत्यक्ष अनुभव, सुसंगतता आणण्याचा ‘सीओईपी’चा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आता ‘बेस्ट’ केंद्राची स्थापना हे नवोपक्रमशील विचारसरणी कृतीत आणण्यासाठी टाकलेले पाऊल आहे,’ असे विनायक पै यांनी सांगितले. तर, ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम या विषयांचा शैक्षणिक रचनेत समाविष्ट केला जाणार असल्याने विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या जागतिक स्तरावर नोकरी मिळवण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे,’ असे डॉ. भिरूड यांनी नमूद केले.
अधिकारी, अभियंत्यांकडून अभ्यासक्रमांची निर्मिती
बेस्ट केंद्रात राबवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची रचना बजाजच्या वरिष्ठ अधिकारी, अभियंत्यांनी केली आहे. तर, ‘सीओईपी’तील प्राध्यापक या अभ्यासक्रमांचे अध्यापन करणार आहेत. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि ‘बजाज ऑटो’ यांच्याकडून संयुक्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे.