पुणे : पुणे शहर आणि परिसरात रात्रीच्या किमान तापमानात एकाच दिवसात अचानक मोठी घट नोंदविली गेल्याने गारठा निर्माण झाला. तापमानातील ही घट दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी शहरात ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

पुणे शहर आणि परिसरात डिसेंबरच्या सुरुवातीपासून तापमानात चढ-उतार सुरू झाले आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. नोव्हेंबरमध्ये १० अंशांखाली तापमान गेले असताना डिसेंबरच्या सुरुवातीला रात्रीचे किमान तापमान १७ ते १८ अंशांपर्यंत वाढले होते. त्यामुळे थंडी पूर्णपणे गायब झाली होती. गारव्याऐवजी उकाडा जाणवत असल्याने नागरिकांना गरम कपड्यांऐवजी पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रणांचा आधार घ्यावा लागला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा घट सुरू झाली. शुक्रवारी तापमानाचा पारा एकदमच १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरला.

हेही वाचा >>> पुणे: वसंत मोरेंची नाराजी दूर करण्यासाठी अमित ठाकरेंची मध्यस्ती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे शहरात गुरुवारी (८ डिसेंबर) १४.७ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात एकच दिवसात तब्बल पाच अंशांनी घट झाली. किमान तापमानाचा पारा थेट ९.४ अंशांपर्यंत खाली आल्याने शहरात पुन्हा गारठा निर्माण झाला. रात्रीच्या किमान तापमानासह दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाली आहे. शुक्रवारी शहरात २९.१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमानातील ही घट आणि गारठा आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदौस चक्रीवादळाचा परिणाम म्हणून शहरातही पावसाळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात वाढ होणार आहे.