scorecardresearch

राज्याला पुन्हा हुडहुडी ; उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, राज्यभरात आणखी तीन दिवस गारठा

हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेले धूळ आणि धुक्याचे मळभ दूर होताच राज्यात सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात झपाटय़ाने घट होऊन ते सरासरीखाली आल्याने गारठय़ात वाढ झाली आहे.

पुणे : हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेले धूळ आणि धुक्याचे मळभ दूर होताच राज्यात सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात झपाटय़ाने घट होऊन ते सरासरीखाली आल्याने गारठय़ात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता असून, राज्यभरात पुढील तीन- चार दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीची लाट आली आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंडीगड आदी राज्यांतील तापमानात मोठी घट झाली आहे. थंडीची ही लाट थेट मध्य प्रदेश आणि गुजरातपर्यंत पोहोचली आहे. या भागातून थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत असल्याने रविवारी संध्याकाळपासून राज्याच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. मध्यरात्री आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमानात मोठी घट झाली. अनेक भागांत एकाच दिवसात किमान तापमानात ५ ते ८ अंशाची घट नोंदविण्यात आली.

मध्य प्रदेशमध्ये मंगळवारी थंडीची लाट तीव्र होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आदी जिल्ह्यात थंडीच्या लाटेची स्थिती राहणार असून, या जिल्ह्यांच्या जवळ असलेल्या पुणे, नगर आदी जिल्ह्यांतही तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. या भागात दाट धुकेही पडणार आहे. मध्य प्रदेशसह गुजरातमध्येही काही भागात थंडीची लाट असल्याने मुंबई परिसर त्याचप्रमाणे कोकणातही तापमानात आणखी काही प्रमाणात घट होण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील उत्तर भागातही थंडीचा कडाका वाढणार आहे. २७ जानेवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. त्यानंतर तापमानात काही प्रमाणात वाढ होईल. 

नाशिक, महाबळेश्वर सर्वात थंड

  • राज्याच्या बहुतांश भागात सोमवारी रात्रीच्या किमान तापमानाचा पारा सरासरीखाली आला. नाशिक आणि महाबळेश्वरचा पारा मोठय़ा प्रमाणावर घसरला.
  • या भागांत अनुक्रमे ६.६ आणि ६.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. पुणे, औरंगाबादमध्ये किमान तापमान १० अंशांच्या जवळपास आले.
  • मुंबई आणि परिसरातही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी खाली येऊन १५ ते १६ अंशांजवळ आले. सोमवारीही दिवसाचे कमाल तापमान राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा ४ ते ७ अंशांनी कमी होते. त्यामुळे दिवसाही गारवा होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cold wave northern maharashtra hailstorm state ysh

ताज्या बातम्या