पुणे : ‘आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवणारी हास्यचित्रे ही स्वतंत्र भाषा आहे. राजकीय विषयावरील टीकात्मक व्यंगचित्र हे लोकशाहीचे प्रतीक असते. तर, अभ्यासक्रमाशी संबंधित व्यंगचित्र हे शिक्षकाची भूमिका बजावणारे असते. या व्यंगचित्रांमुळे जीवनातील क्लिष्टता कमी होते,’ असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी रविवारी व्यक्त केले.

विश्वास प्रकाशनातर्फे जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला मधुकर धर्मापुरीकर लिखित ‘हास्य चित्रे-देशातली परदेशातली’ या पुस्तकाचे प्रकाशन शि. द. फडणीस आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणीस बोलत होते.प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे आणि विश्वास प्रकाशनाच्या संचालक वैशाली पेंडसे-कार्लेकर या वेळी उपस्थित होत्या.

फडणीस म्हणाले, ‘गणितासारख्या क्लिष्ट विषयात व्यंगचित्रांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला विरोधदेखील झाला. मात्र, व्यंगचित्र कलेच्या बाजूने उभ्या राहिलेल्या सुजाण व्यक्तींंमुळे ती संकल्पना प्रत्यक्षात आली. व्यंगचित्र हे केवळ हास्य निर्माण करत नाही, तर चित्र पाहणाऱ्याला ज्ञानचक्षू प्रदान करीत असते. नव्या पिढीतील मुलांपर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून व्यंगचित्रे पोहोचविण्याचा विश्वास प्रकाशनाचा प्रयत्न स्तुत्य आहे. व्यंगचित्रांचा अभ्यास करण्यासाठी झपाटून जाऊन काम करणारे धर्मापुरीकर हे उत्तम व्यसनी व्यक्ती आहेत.’

काळपांडे म्हणाले, ‘व्यंगचित्र पाहण्याची, वाचण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. पालक मुलांकडे वाचनाचा आग्रह धरतात. ते काही प्रमाणात योग्य असले, तरी मुलांना चित्रे, हास्यचित्रे पाहू द्यावी. त्यातून मुलांची दृष्टी विकसित होते.’

धर्मापुरीकर म्हणाले, ‘काळ, देश, धर्म यांच्या सीमारेषा पार करणारी व्यंगचित्र ही वैश्विक भाषा आहे. व्यंगचित्रकार हे उत्तम लेखक असतात. आपल्याकडे व्यंगचित्रकाराला पुरेसा मान आणि मानधन मिळत नसल्याने मराठी व्यंगचित्र कला क्षीण राहिली. वास्तवाचे भान असण्यासाठी विनोदाचे अंग असणे आवश्यक असते. विनोद जगण्याकडे खेळकर वृत्तीने पाहायला शिकवतो.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशाली पेंडसे -कार्लेकर यांनी प्रास्ताविक केले. अंजली लिमये यांनी सूत्रसंचालन केले. विशाखा पेंडसे-पंढरपुरे यांनी आभार मानले.