पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांनी पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याच्या आरोपांची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी समितीतर्फे (एसआयटी) चौकशी केली जाणार आहे.

या समितीला एक महिन्याच्या आत अहवाल देण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्याच्या महसूल आणि वन विभागाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नोंदणी महानिरीक्षक आणि जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख हे सदस्य, तर अपर जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकाविल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या संदर्भात दमानिया यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घनवट आणि त्यांचे कुटुंबीय तसेच ‘घनवट ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने राज्यात किती ठिकाणी खरेदी व्यवहार झाले आहेत, त्यांच्या संलग्न अन्य संस्था, कंपन्यांसाठी अकृषिक कारणांसाठी वर्ग केलेल्या जमिनी, खरेदी व्यवहारात बाजारभावापेक्षा कमी मोबदल्याने रक्कम देऊन खरेदी झाली आहे का, अनुसूचित जमाती खातेदारांच्या जमिनी, महार वतनाच्या तसेच नवीन शर्तीच्या जमिनींच्या खरेदी व्यवहारांतील किती प्रकरणांमध्ये विनापरवानगी खरेदी व्यवहार झाले आहेत, या मुद्द्यांची, तसेच ‘मे. घनवट ॲग्रो फूडस’च्या वतीने पोपटशेठ मारुती घनवट यांच्या नावाने खरेदी झालेल्या व्यवहारांची आणि फसवणुकीसंदर्भात राज्यभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही तपासणी या चौकशी समितीकडून होणार आहे.