पिंपरी पालिकेचे ‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ‘दोन हात’ करण्यासाठी शहर भाजपचे नेतृत्व आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे देण्यात येईल, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. मात्र, आपण शहराध्यक्षपदासाठी बिलकूल इच्छुक नसल्याचे जगताप यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आतापर्यंत सावध पावित्र्यात असलेले इच्छुक खऱ्या अर्थाने िरगणात येतील आणि शहराध्यक्षपदासाठी तीव्र स्पर्धा होईल, असे स्पष्ट चित्र आहे.
विद्यमान शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची मुदत संपली असून नव्या अध्यक्षपदासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. महामंडळ अथवा शासकीय पद मिळणार नसेल तर खाडे पुन्हा शहराध्यक्ष होण्यास उत्सुक आहेत. याशिवाय, अशोक सोनवणे, महेश कुलकर्णी, बाळासाहेब गव्हाणे, माउली थोरात, अमोल थोरात, उमा खापरे, रघुनंदन घुले आशी अनेक नावे चर्चेत आहेत. जगताप आतापर्यंत या विषयावर जाहीरपणे बोलत नव्हते. त्यांच्याकडून सारंग कामतेकर यांचे नाव पुढे काढण्यात येईल, अशी अटकळ पक्षातून व्यक्त करण्यात येत होती. भाजप पक्षश्रेष्ठींच्या व्यूहरचनेनुसार जगताप यांनाच सेनापतीपदाची जबाबदारी देण्याचे नियोजन आहे. मात्र, योग्य पध्दतीने संवाद होत नसल्याने निर्णय रखडला आहे. जगताप शहराध्यक्ष होतील, या शक्यतेने अन्य इच्छुक मोर्चेबांधणीही करत नव्हते. गुरूवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपण इच्छुक नसल्याचे सांगितले. त्यामुळे अन्य इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आणि ते तातडीने कामालाही लागले. शहराध्यक्षपदाच्या निर्णयाचा थेट संबंध महापालिकेच्या निवडणुकीशी असल्याने सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष शहराध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत.