पीएच.डी. मार्गदर्शक त्रास देत असल्यास संशोधक उमेदवारांना तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. प्रक्रिया सुधारणेसाठी संकेतस्थळाची निर्मिती केली असून, त्यात संशोधक उमेदवार तक्रार नोंदवू शकणार आहेत. तसेच उमेदवारांना त्यांचे नाव गोपनीयही ठेवता येणार आहे.

सांगवीतील बाबूरावजी घोलप महाविद्यालयात पीएच.डी. पदवीसाठी सादर केलेला प्रबंध नाकारून सुधारणा करत पुन्हा सादर करणे आणि त्याला मान्यता देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मार्गदर्शक प्राध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकारानंतर आता पीएच.डी. मार्गदर्शकांकडून संशोधक उमेदवारांच्या केल्या जाणाऱ्या शोषणाचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे.

हेही वाचा >>> पुढील दोन महिन्यांसाठी हवामानाचा अंदाज काय? हवामान विभागाने दिली माहिती…

हेही वाचा >>>पुणे : शहरात अघोषित पाणीकपात? पेठांचा भागवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले, की पीएच.डी. मार्गदर्शक शोषण करत असल्याची एकही अधिकृत तक्रार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे अद्याप दाखल झालेली नाही. संशोधक उमेदवारांना त्यांच्या करिअरची चिंता असल्याने उमेदवार तक्रार नोंदवत नाहीत असे असू शकते. मात्र पीएच.डी. प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने ‘पीएच.डी. ट्रॅकिंग सिस्टिम’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. मार्गदर्शकाकडून कोणत्याही प्रकारे शोषण होत असल्यास त्याबाबत तक्रार नोंदवण्याची सुविधा पीएच.डी.च्या नव्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानुसार प्र-कुलगुरू, उपकुलसचिव, मार्गदर्शक, प्राचार्य यांच्यापर्यंत थेट तक्रार नोंदण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तक्रारदार उमेदवाराचे नाव गोपनीय ठेवण्याचीही त्यात सुविधा असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएच.डी. प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी संशोधक उमेदवारांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातील प्रतिसादांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यानंतर पीएच.डी.च्या संकेतस्थळात अधिक सुधारणा केल्या जाणार आहेत. – डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ