लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शहराची पुणे आणि सभोवतालच्या औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मोशी-चऱ्होली ९० मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या ९ हजार ५६३ मीटर रस्त्यापैकी ७ हजार ८०३ मीटर रस्ता विकसित केला आहे. उर्वरित दोन किलो मीटर रस्त्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची सूचना भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली.

मोशीतील जयगणेश साम्राज्य चौकातून सुरू होणारा हा रस्ता प्राईड सिटी, चऱ्होलीत संपतो. पहिल्या टप्प्यात ७ हजार ८०३ मीटर रस्ता विकसित झाला आहे. उर्वरित रस्त्याचे भूसंपादन, शेतकऱ्यांचे प्रश्न, विकास हक्क (टीडीआर) या तांत्रिक अडचणींबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत आमदार लांडगे यांनी जागेवर जाऊन पाहणी आणि चर्चा केली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजय खोराटे, नगररचना विभागाचे सहसंचालक संदेश खडतरे यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-पिंपरी महापालिकेने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केली ‘ही’ सुविधा, घरबसल्या होणार काम

मोशी-चऱ्होली-चिखली या भागात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. पिंपरी-चिंचवडमधून पुणे- सोलापूर महामार्ग, पुणे-अहमदनगर महामार्गाला जाण्यासाठी हा महामार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा रस्ता आगामी काळात चऱ्होलीसह पिंपरी-चिंचवडची वाहतूक सक्षम करणारा प्रमुख रस्ता ठरणार आहे. या कामासाठी १५ दिवसांतून एकदा बैठक घेण्यात येईल असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रस्त्यामुळे पुणे, लोहगाव विमानतळ आणि औद्योगिक क्षेत्र जोडले जाणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील रस्त्याचे काम सुरू झाले आहे. पिंपरी हद्दीतील रस्ता आगामी सहा महिन्यांत पूर्ण करावा. -महेश लांडगे, आमदार