संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठा गाजावाजा करीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. परंतु, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम अजूनही संपत नसल्याचे चित्र आहे. या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकटच होत आहे. यातच प्रवाशांनीही मेट्रोकडे पाठ फिरवली आहे.

हेही वाचा >>>पुणे : मिळकतकराच्या ४० टक्के सवलतीसंदर्भात आज बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो प्रवासी सेवेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किलोमीटर) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किलोमीटर) असे ३३ किमी लांबीचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक या ७ किलोमीटर मार्गावर आणि वनाज स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक या ५ किलोमीटर मार्गावर प्रवासी सेवा गेल्या वर्षी ६ मार्चला सुरू करण्यात आली. मात्र, वर्षभरानंतरही विस्तारित प्रवासी सेवा मेट्रोला पूर्ण करता आलेली नाही.
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामे दोन्ही शहरांत सुरू आहेत. अनेक रस्त्यांवर ही कामे सुरू आहेत. हे सर्व मुख्य रस्ते असून, अतिशय वर्दळीचे रस्ते आहेत. मेट्रोच्या कामांमुळे हे रस्ते अरूंद झाले आहेत. कारण या रस्त्यांचा बहुतांश भाग मेट्रोच्या कामाने व्यापला आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या भीषण स्वरूप धारण करीत आहे. आधीच कोंडीने त्रासलेल्या वाहनचालकांचे यामुळे आणखी हाल होत आहेत. शहरातील कोंडीसाठी वाहतूक पोलिसांसह इतर सरकारी यंत्रणा मेट्रोकडे बोट दाखवत आहेत.

हेही वाचा >>>पुण्यात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक, “पेन्शन आमच्या हक्काचं…” लिहिलेले बोर्ड कर्मचाऱ्यांच्या हाती

मेट्रो सुरू झाल्यापासून आकडेवारी पाहिल्यास प्रवासी संख्येत वाढ होण्याऐवजी घट होत आहे. मेट्रो सुरू झाली त्या वेळी मागील वर्षी मार्चमध्ये दोन्ही मार्गांवरील प्रवासी संख्या ५ लाख १४ हजार होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ती २ लाख २३ हजारांवर आली. प्रवासी संख्या मे महिन्यात १ लाख ८८ हजार, जून महिन्यात १ लाख २३ हजार आणि जुलैमध्ये ८० हजारांवर आली. ऑगस्ट महिन्यात मेट्रोची प्रवासी संख्या पुन्हा वाढून २ लाख २ हजारांवर पोहोचली. पुन्हा त्यात घसरण सुरू होऊन ती सप्टेंबर १ लाख २८ हजार, ऑक्टोबर १ लाख १३ हजार, नोव्हेंबर १ लाख १२ हजार आणि डिसेंबरमध्ये १ लाखावर आली. चालू वर्षातील जानेवारी महिन्यात प्रवासी संख्या १ लाख तर फेब्रुवारी महिन्यात ९० हजारांवर आली.

मेट्रोचा वर्षभराचा प्रवास
दोन्ही मार्गांवरील प्रवासी : १९ लाख ७८ हजार १६०
दोन्ही मार्गांवरील उत्पन्न : २ कोटी ५८ लाख ७० हजार ५१०
मेट्रोची रोजची सरासरी प्रवासी संख्या – ५ हजार

फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय, गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय आणि शिवाजीनगर न्यायालय ते रूबी हॉल रुग्णालय या मार्गांचे काम महिनाअखेरीस पूर्ण होईल. यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त तपासणी करून अहवाल देतील. त्यांनी मान्यता दिल्यानंतर लगेचच या मार्गांवर सेवा सुरू होईल. सध्या मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ५ हजार असून, हे मार्ग सुरू झाल्यानंतर ती दीड ते दोन लाखांवर जाईल.- हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Completed one year of metro passenger service in pune and pimpri chinchwad cities pune print news stj 05 amy
First published on: 17-03-2023 at 15:19 IST