हिंजवडी परिसरातील एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सोमवारी ‘एसएससी’ बोर्डाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा सुरू होती. मात्र, पेपर सुरू असतानाच अचानक वीज गेली तसेच अनेकदा पेपर देत असलेले कॉम्प्युटर देखील बंद पडले. यामुळे हैराण झालेल्या परीक्षार्थींनी पेपरवर बहिष्कार टाकत, महापोर्टलविरोधात महाविद्यालय परिसरात घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, संबंधित पेपर रद्द करण्यात झाला असल्याची माहिती परीक्षार्थींनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवळपास तीनशे ते चारशे परीक्षार्थी हा पेपर देण्यासाठी वेगवेगळ्या शहरातून आले होते. साडेआठ वाजेच्या सुमारास सर्व परीक्षार्थी हिंजवडीमधील अलार्ड महाविद्यालयातील केंद्रावर दाखल झाले होते. दहवाजेच्या सुमारास सर्वांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला व सर्वांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर परीक्षार्थी पेपर सोडवण्यास बसले. मात्र, पहिल्या दहा मिनिटात तीन ते चारवेळा कॉम्प्युटर बंद पडले. पुन्हा लॉगिन केले तरी ही कॉम्प्युटर बंदच पडत होते. काहींनी निवडलेली उत्तर अपलोड होत नव्हती, दुसरीकडे वेळ जात होता, हे कमी म्हणून की काय अनेका वीज देखील खंडीत झाली असल्याचे परीक्षार्थ्यांकडून सांगण्यात आले.

ऑनलाईन पेपर सुरू होऊन जवळपास अर्धा तास उलटला मात्र हा घटनाक्रम सुरूच होता. ही समस्या सर्व परीक्षार्थींना जाणवत होती. त्यामुळे सर्वजण केंद्राच्या बाहेर पडले. संतापलेल्या परीक्षार्थींनी महापोर्टलच्या विरोधात महाविद्यालयाच्या आवारातच घोषणाबाजी केली. दरम्यान, बाहेर पडल्यानंतर एकमेकांचे प्रश्न देखील माहित झाले त्यामुळे पेपर फुटल्याचा संशय परीक्षार्थींनी व्यक्त केला आहे. हा सर्व घटनाक्रम झाल्यानंतर संबंधीत प्रशासनाकडून आजचा पेपर रद्द करत लवकर पुन्हा परीक्षा घेण्यात येईल, याबाबत मेलद्वारे कळवण्यात येईल असं सांगण्यात आले असल्याचे परीक्षार्थी योगेश घुगे याने सांगितले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion during the examination of the junior clerk of the ssc board msr
First published on: 02-12-2019 at 16:15 IST