पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाचा (महावितरण) खंडित होणारा वीजपुरवठा याचा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘ई-शिवनेरी’ या इलेक्ट्रिक बस सेवेला बसत आहे. कोंडीत जास्त वेळ अडकल्यास ऊर्जा जास्त खर्च होऊन बसच्या क्षमतेवर परिणाम होऊन ते उशिराचे कारण ठरते, तर खंडित वीज बस चार्ज करण्यात अडथळा ठरते. याचा विशेषत: मुंबई, ठाणे, दादर, बोरिवली, पुणे या बसच्या वेळापत्रकावर होतो आहे.

पुणे एसटी महामंडळाच्या स्वारगेट आणि स्टेशन आगारातून दररोज पहाटे पाचपासून रात्री उशिरापर्यंत दादर, बोरिवली, ठाणे या मार्गावर दर तासाने ‘ई शिवनेरी’ सोडली जाते. तितक्याच बस दादर आणि मुंबई एसटी आगारातून पुणे मार्गावर धावतात. दिवसभरात जवळपास ५० हून अधिक ‘ई शिवनेरी’ची सेवा सुरू असते. पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी सुविधा मिळावी, प्रवास सुकर होण्यासाठी सर्वाधिक ई शिवनेरी बस या मार्गावर सोडण्यात येतात. या सेवेला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला आहे.

‘ई-शिवाई आणि ई शिवनेरी या बस पुण्यातील शंकरशेठ रस्त्यावरील चार्जिंग स्थानकात चार्ज केल्या जातात. लोणावळा येथील घाट परिसर, वळणावळणाचे रस्ते, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा यामुळे या बस वाहतूक कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते. त्यामुळे शेवटच्या स्थानकात पोहोचण्यास विलंब होतो,’ असे ‘ई शिवनेरी’ चालकांकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खंडित विद्युत पुरवठ्यामुळे एसटी सेवा विस्कळीत

पुणे एसटी महामंडळाचे स्वारगेट आणि शंकरशेठ रस्त्यावरील विभाग नियंत्रक कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानक आहे. एक एसटी पूर्ण चार्ज होण्यासाठी दोन तासांचा कालावधी द्यावा वागतो. हे ध्यानात घेऊन या एसटीचे त्यानुसार वेळापत्रक निश्चित केले आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून या परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजवितरण व्यवस्थेत समस्या येत असल्याचा परिणाम बस चार्जिंगवर होत असून, वेळापत्रकही कोलमडले आहे.

मुंबई-द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची मंदावलेली गती, इतर ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि चार्जिंग स्थानकातील खंडित होणारा विद्युत पुरवठा यामुळे ई-शिवनेरी, शिवाई या बसच्या चार्जिंगसाठी वेळ लागत आहे. वेळापत्रकावर परिणाम होत असल्याने प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. – अरुण सिया, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ