‘तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क’ असे म्हटले जाते. मात्र, पुणे शहर काँग्रेसच्या बाबतीत ही बाब नेमकी उलटी झाली आहे. ज्येष्ठ अजूनही आपण तुर्क म्हणजे काही तरी नवीन घडवून पक्षात आमूलाग्र बदल करू, असा भाबडा आशावाद बाळगून ते खुर्ची सोडायला तयार नाहीत. ज्येष्ठ नेते खुर्चीवरून ‘हात’ काढायला तयार नाहीत, तर युवक काँग्रेसचे पदाधिकारी हे हात दाखवून अवलक्षण नको, असे समजून आणि आता पक्षात काही राहिले नसल्याची काळाची पावले ओळखून पक्षाला लांबूनच ‘हात’ दाखवून राम राम करत आहेत. त्यामुळे पुण्यातील काँग्रेस आता ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुण्यातील काँग्रेसने एके काळी पुण्यावर अधिराज्य गाजवले. काँग्रेसमध्ये तरुणांंचे मोठे संघटन होते. युवक काँग्रेसमधील पदाधिकारी म्हणजे भावी नगरसेवक ते आमदार, खासदार आणि मंत्री होण्याचे पहिले पाऊल समजले जात होते. आज युवक काँग्रेसची पुण्यातील आणि राज्य पातळीवरील स्थिती दयनीय आहे. शहर काँग्रेसचा अध्यक्ष नव्याने नेमला गेला, की युवक काँग्रेसची कार्यकारिणी बदलली जाते. नवीन अध्यक्षाकडून युवक काँग्रेसचे पदाधिकारी नेमताना विश्वासू साथीदारांना संधी दिली जाते. हे परंपरेने चालत आले आहे. पुण्यातील युवक काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांंची निवड होऊन साडेतीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, हे पदाधिकारी नाममात्र आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची तसदी ज्येष्ठ नेते घेताना दिसत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी पक्ष सोडत आहेत.कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्यामुळे मागील काही काळ काँग्रेसमधील मरगळ झटकून कार्यकर्ते कामाला लागले होते. मात्र, तेदेखील काँग्रेस संस्कृतीला कंटाळून सोडून गेले. भोर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार संग्राम थोपटे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या दोन्ही माजी आमदारांमागे तरुणांचे संघटन होते. मात्र, काँग्रेसने नव्या पिढीला जोडण्याची संधी गमावली.

नुकतेच युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपविला. त्यांंच्यासह युवक काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सुरवसे-पाटील यांंच्या तीन पिढ्या काँग्रेसचे काम करत आल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली. पक्षाच्या व्यासपीठावर तरुणांना स्थान न देणे, युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक न देणे, ज्येष्ठ नेत्यांकडून युवक कार्यकर्त्यांना पाठबळ न मिळणे, केलेल्या कामाची दखल न घेतल्याने हिरमोड होणे यांसारखी कारणे त्यामागे असल्याची खंंत सुरवसे-पाटील यांनी पक्ष सोडताना व्यक्त केली. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांंची ही प्रातिनिधिक भावना आहे.शहर काँग्रेसमध्ये एकदा पदाची खुर्ची मिळाली, की ती लवकर न सोडण्याची प्रवृत्ती गेल्या काही वर्षांत बळावली आहे. अगदी शहराध्यक्षपदाचा विचार केल्यास या पदावर नेमणूक झाल्यावर वर्षानुवर्षे पद हाती ठेवण्यावर ज्येष्ठ नेत्यांचा भर राहिला आहे. गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसची ही राजकीय परंपरा सुरू आहे. त्याची सुरुवात १९९४ पासून झाली. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर १९९४ ते १९९७ पर्यंत शहराध्यक्ष होते. तोपर्यंत शहराध्यक्षांचा कालावधी हा कमाल तीन वर्षांपर्यंत होता. त्यानंतर शहराध्यक्ष बदलत होते. १९९७ नंतर २००४ या काळात माजी आमदार मोहन जोशी यांनी शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर शहर काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अभय छाजेड राहिले आहेत. त्यांच्याकडे २००४ ते २०१६ अशी तब्बल १२ वर्षे हे पद होते. त्यांच्यानंतर माजी राज्यमंत्री रमेश बागवे २०१६ ते २०२२ पर्यंत या पदावर होते. १० जून २०२२ पासून अरविंद शिंदे प्रभारी शहराध्यक्ष आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसची ही खुर्ची लवकर न सोडण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत चालली असताना तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लवकरच संघटनात्मक बदल होणार, असे जाहीर केले. मात्र, अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सपकाळ हे पुणे दौऱ्यावर आल्यावर त्यांच्याभोवती जुन्याच सवंगड्यांचे कडे असते. आता सपकाळ हे नवे भिडू निवडताना ज्येष्ठांना निवृत्त करणार का, याबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.sujit.tambade@expressindia.com