पुणे : ‘काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी मतचोरी उघड करून निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले. मात्र, त्यावर निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेले नाही. निवडणूक आयोगाचे काम नि:पक्षपातीपणे कर्तव्य बजावणे आहे. मात्र, निवडणूक आयोग हा भाजपसाठी काम करतो आहे,’ असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला. मतचोरीविरोधात काँग्रेस आंदोलन करत राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक काँग्रेस भवन येथे घेण्यात आली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सहप्रभारी बी. एम. संदीप, विधान परिषदेतील गटनेते, निरीक्षक सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.
चेन्नीथला म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेला मतचोरीचा प्रकार राहुल गांधी यांनी निदर्शनास आणून दिला. मात्र, आयोगाकडून उत्तर देण्यात आलेले नाही. त्यावरून निवडणूक आयोग हे भाजपसाठी काम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस मतचोरीविरोधात आंदोलन करत राहणार आहे.’
‘महाराष्ट्रात पूरस्थिती असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. मात्र, राज्य सरकारने आतापर्यंत मदत दिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्री याबाबत काहीही बोलत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत मागितली. मात्र, अद्याप मदत जाहीर केलेली नाही. केंद्रीय मंत्री किंवा पथकही पाठवण्यात आलेले नाही,’ अशी टीका चेन्नीथला यांनी केली. ‘राज्य सरकार हे जातीय तेढ निर्माण करत आहे. तसेच, विकासाच्या नावाखाली खाणमाफियांना बळ देण्याचे काम करत आहे,’ असा आरोपही चेन्नीथला यांनी केला.