जेजुरी : पुरंदर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथे शक्तिप्रदर्शन करत जगताप यांच्यासह त्यांचे ५७८ समर्थक हे भाजपवासी झाले. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक, पंचायत समितीचे माजी सदस्य आदींचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून जगताप हे नाराज होते. त्यांनी नुकताच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. गेल्या शनिवारी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार सासवड येथे पालखी मैदानात जाहीर सभा घेत जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे, माजी मंत्री बाळा भेगडे, सोनई उद्योग समूहाचे प्रवीण माने, रवि अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, गणेश भेगडे, बाबा जाधवराव, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, वासुदेव काळे, जालिंदर कामठे आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘माजी आमदार संजय जगताप हे विधानसभेत लोकांच्या हिताच्या योजना मांडायचे. मात्र, ते चुकीच्या पक्षात होते. आता ते भाजपमध्ये आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राप्रमाणे पुरंदरमधील प्रलंबित कामे सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकत वाढली आहे.’
‘पुरंदर तालुक्यात नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, नदीजोड प्रकल्प, गुंजवणी पाणीपुरवठा प्रकल्प, रेशीम उद्योग प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असून, राज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अभ्यासपूर्ण नेतृत्व आहे. मतदार संघाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.’ असे माजी आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.
पुरंदर तालुक्यात भाजपला बळ
माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पुरंदर तालुक्यातील भाजपची ताकद वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला बळ मिळण्याची शक्यता आहे. जगताप यांचे तालुक्यात प्राबल्य असल्याने आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि शिवसेना (शिंदे) पक्षापुढे आव्हान उभे राहणार आहे. या मतदार संघात शिवसेना (शिंदे) पक्षाचे विजय शिवतारे हे विद्यमान आमदार आहेत.