पुणे : केंद्रातील मोदी सरकारची सर्वच स्तरावर पोल-खोल होत असल्याने बदनामीपासून वाचण्यासाठी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हे तथ्यहीन आरोप करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.
मोदी सरकारने स्वायत्त संस्थांचा राजकीय वापर करूनही २०२४ मध्ये देशातील जनतेने काँग्रेसच्या शंभर टक्के जागा वाढवून, मजबूत विरोधी पक्षनेते पद बहाल केले, तर भाजपच्या संसदेतील ३५ टक्के जागा कमी केल्या आहेत, असा दावा तिवारी यांनी केला.
मतदारांनी लोकसभेतील जागा कमी केल्याचे भान भाजपने ठेवावे. विरोधी पक्षनेते पदावर काम करणाऱ्या राहुल गांधी यांनी मेव्हणे रॉबर्ट वाड्रा यांच्यासाठी पदाचा कसा गैरवापर केला, हे स्पष्ट करावे. बोलायची संधी मिळाली म्हणून भाजपच्या प्रवक्तांनी तथ्यहीन आरोप केले आहेत, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.
तिवारी म्हणाले, ‘रॅाबर्ट वाड्रा यांनी कोणत्याही नियमांचा आणि कायद्याचा भंग केला नाही, याबाबतचे प्रतिज्ञापत्र एप्रिल २०२३ मध्ये भाजपच्या हरियाना सरकारला न्यायालयात दाखल करावे लागले. त्यामुळे त्यांच्या विरोधातील दाव्यांमधील हवा निघून गेल्याने भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सक्षमपणे सांभाळले. ते केंद्रात सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारच्या कारभारावर; तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत असल्याने मोदी सरकारच्या पायखालची वाळू सरकली आहे.’
‘केंद्रात सत्ताधारी झाल्यापासून गेल्या साडेअकरा वर्षात जंग जंग पछाडून देखील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या कुटुंबातील एक ही भ्रष्टाचार भाजप सरकार सिद्ध करू शकले नाहीत. विजय मल्ल्या, ललित मोदी यांनी पलायन केले. त्यांच्याकडून पदांचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे भाजपने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.’ अशी टीका तिवारी यांनी केली.
‘स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत आणि लोकशाहीच्या रक्षणातील अमूल्य योगदान असल्याने जनतेचा नेहरू -गांधी कुटुंबीयांना पाठिंबा मिळत आहे. ते भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला पचनी पडत नाही. त्यामुळे टोकाची ईर्षा आणि असुयेमुळेच राहुल गांधींच्या बदनामीचा घाट घालण्याचे प्रयत्न वारंवार भाजप कडून केले जात आहे.’ असा आरोप तिवारी यांनी केला.