विजेच्या चोरीची शंका घेऊन कोणतीही पूर्वसूचना न देता ग्राहकाचा वीजेचा पुरवठा खंडित केला. तो पुन्हा सुरळीत करण्यासाठी साडेसात लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, त्या वाढीव बिलाचा तपशीलही ग्राहकाला दिला नाही, म्हणून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनीला (महावितरण) ग्राहक मंचाने फटकारले आहे. वसूल केलेल्या जास्त बिलाचा तपशील न देणे ही सुद्धा सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट करीत भरलेले ७ लाख ६८ हजार रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत.
याबाबत मोतीलाल पूनमचंद राठोड (रा. पर्णकुटी पायथा, येरवडा) यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. राठोड यांनी त्यांच्या निवासाच्या ठिकाणी तीन फेजच्या विजेची जोडणी घेतली होती. ते नियमितपणे विजेच्या बिलाचा भरणा करीत होते. जुलै २०११ मध्ये येरवडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राठोड यांच्या विजेच्या मीटरची तपासणी करण्यासाठी घरी आले. त्यांनी वीज भरणा केलेली जुनी बिले पाहिली. तुमच्या वीज मीटरमध्ये दोष असून तो कार्यालयात जमा करावा लागेल, असे सांगून अभियंता मीटर घेऊन गेला. तक्रारदार हे बाहेरून घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. ते तत्काळ उपअभियंत्याच्या कार्यालयात गेले. त्या वेळी अभियंत्याने विजेच्या चोरीची शंका व्यक्त करीत या प्रकरणी अटक होऊन सात वर्षांपर्यंत शिक्षा होईल, असे राठोड यांना सांगितले. विजेचे जोडणी करून देण्यासाठी अगोदर सात लाख ६८ हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, त्यासाठी कोणतीही लेखी सूचना दिली नाही. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे वाद घालून राठोड यांनी सात लाख ६८ हजार रुपये भरले. मात्र, त्यांना पुन्हा ४८ हजार रुपये भरण्यास सांगितले. विरोध करून ही सुद्धा रक्कम त्यांनी भरली. एवढय़ा मोठय़ा रकमेचे वीज वापरलेली नसताना देखील धाकाने रक्कम भरण्यास भाग पाडले. राठोड यांनी या बिलाचा तपशील मागितला, पण तो देखील वीज कंपनीने दिला नाही. म्हणून शेवटी त्यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली.
ग्राहक मंचाने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावल्यानंतर मंचासमोर हजर झाले. पण, त्यांनी लेखी कोणतेही म्हणणे सादर केले नाही. वीज कंपनीने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रक्कम घेतल्यानंतर वीज वापराबाबतचा तपशील ग्राहकाला देणे आवश्यक आहे. मात्र, हा तपशील व कारणे न देताच वसूल केलेली रक्कम ही अनुचित व्यापार प्रथेअंतर्गत येणारी बाब आहे. त्यामुळे कंपनीने ग्राहकाकडून घेतलेली रक्कम व्याजासह परत द्यावी, तसेच, तक्रारीचा खर्च आणि त्रासापोटी दहा हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात यांनी दिला आहे.