खडकवासला धरणातून मुठा नदीत यंदाच्या हंगामात आतापर्यंत तब्बल १४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडून देण्यात आले आहे. महानगरपालिकेकडून दरवर्षी १६ ते १७ टीएमसी पाणी वापरण्यात येते. त्यानुसार शहराला दहा महिने पुरेल एवढे पाणी आतापर्यंत नदीत सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सायंकाळनंतर विसर्ग कमी करून तो ८५६० क्युसेक करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून २९.१५ टीएमसी म्हणजेच १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात दहा मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे आठ आणि सात मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात दोन मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. टेमघर धरणातून ३२० क्युसेकने, वरसगाव धरणातून ४४४० क्युसेकने, पानशेत धरणातून १९५४ क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

हेही वाचा : पिंपरीतील राजकीय सत्तासंघर्षात नव्या आयुक्तांनाही तारेवरची कसरत

त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सायंकाळी सातनंतर ७७०४ क्युसेकने, तर रात्री नऊनंतर ८५६० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. यंदाच्या हंगामात आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत १३.८९ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर व परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले असून या धरणात दिवसभरात ३२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. बहुतांशी धरणांत समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी हे धरण देखील १०० टक्के भरले आहे, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : पुणे : पदवी प्रथम वर्ष प्रवेशांबाबत बीएमसीसीला नोटिस; महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह

जिल्ह्यातील २२ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा, वडीवळे, कासारसाई, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, भाटघर, वीर, नाझरे आणि उजनी अशी २२ धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे या धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continuing at 8560 cusecs water release in kahadkwasla dam which can supply the city for ten months pune print news tmb 01
First published on: 25-08-2022 at 11:37 IST