पुणे : सार्वजनिक विश्वस्त संस्थांच्या बचत खात्यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे नियम १ एप्रिलपासून लागू झाले आहेत. त्यानुसार ठरावीक निकषांची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत करमुक्त विश्वस्त संस्थांनाच सहकारी बँकांमध्ये बचत ठेव खाती ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर, इतर अपात्र संस्थांची बचत खाती चालू खात्यात रूपांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे करमुक्त प्रमाणपत्र नसलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बचत खाती आता चालू खात्यात रूपांतरित केली जाणार असून, एका अर्थाने गणेशोत्सव मंडळांच्या आर्थिक व्यवहारांवर आता नियंत्रण येणार आहे.
उद्यम विकास सहकारी बँकेचे संचालक संदीप खर्डेकर यांनी या बाबतची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या १ एप्रिल २०२५पासून अंमलात आलेल्या सुधारित निर्देशानुसार सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट आणि अशा संस्थांच्या बचत खात्यांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्देशांनुसार ठरावीक निकष पूर्ण करणाऱ्या नोंदणीकृत करमुक्त विश्वस्त संस्थांनाच सहकारी बँकांमध्ये बचत ठेव खाती ठेवण्याची परवानगी आहे, तर इतर अपात्र संस्थांची बचत खाती चालू खात्यात रूपांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या नियमनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, नोंदणीकृत नसलेल्या सोसायट्यांसारख्या संस्थांच्या बँकिंग व्यवहारांना शिस्त लागणार आहे. मात्र, या नियमाची माहिती नसल्याने अनेक मंडळाचे व्यवहार अडविले असल्याने त्यांची अडचण होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे खर्डेकर यांनी सांगितले.
नोंदणीकृत नसलेल्या सोसायट्या, अपार्टमेंटलाही नियम लागू
आयकर कायदा १९६१अंतर्गत संपूर्ण उत्पन्न करमुक्त असलेल्या नोंदणीकृत धर्मादाय विश्वस्त संस्थांनाच बचत ठेव खाते ठेवण्याची मुभा आहे. संबंधित पात्र संस्थांनी आयकर विभागाकडून प्राप्त वैध करमाफी प्रमाणपत्र बँकेत सादर करणे बंधनकारक आहे. संस्थेकडे करमाफी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास संस्थेचे बँकेतील बचत खाते बंद करून चालू खात्यात रूपांतरित करावे लागणार आहे. नोंदणीकृत नसलेल्या सोसायट्या, अपार्टमेंट-काँडोमिनियम रहिवासी संघ, गणेशोत्सव मंडळे यांनाही हे नियम तितकेच लागू आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार नोंदणीकृत करमुक्त विश्वस्त संस्थांना सहकारी बँकांमध्ये बचत ठेव खाती ठेवण्याची परवानगी असणार आहे. करमुक्त प्रमाणपत्र नसलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बचत खाती आता चालू खात्यात रूपांतरित केली जाणार आहेत. चालू खात्यामुळे संबंधित संस्थांच्या जमा रकमेवर आता बचत खात्याचे व्याज मिळणार नाही. तसेच, रक्कम काढण्यावरही काही निर्बंध असणार आहेत. आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने सार्वजनिक विश्वस्त संस्थांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन केले पाहिजे.- संदीप खर्डेकर, संचालक, उद्यम विकास सहकारी बँक