पिंपरी : घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरुन चढ्या दराने काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार हिंजवडीत उघडकीस आला. पोलिसांनी छापा मारून कारवाई करीत अवैध साठ्यासह पाच जणांना अटक केली.

धर्मपाल जगदीश बिश्नोई ( वय २३, हिंजवडी), अशोक बाबुराव सूर्यवंशी ( वय ३२, पिंपळे सौदागर), अशोक ओमप्रकाश खिलारी ( वय २४, हिंजवडी), बाळु बापू हजारे (वय २५, मारुंजी), ओमप्रकाश सोहनलाल खिल्लेरी ( वय ४५, हिंजवडी) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकातील विजय नलगे यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे घरगुती गॅस सिलेंडरमधून धोकादायक पद्धतीने व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरत होते. त्या सिलेंडरची बाजारात चढ्या दराने विक्री केली जात होती. याबाबत माहिती मिळाली असता छापा मारून कारवाई केली. आरोपींकडून २० लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्‌देमाल हस्‍तगत केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टेम्‍पोच्‍या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू

भरधाव वेगातील टेम्‍पोने धडक दिल्‍यामुळे दुचाकीवरील तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना कुरुळी गावातील स्पायसर चौक ते अराई चौकदरम्यान गुरुवारी (१० जुलै) दुपारी घडली. रचित उमेश शिंदे (२३, भांडूप, मुंबई) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अर्जुन सोनटक्के यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रचित हा दुचाकीवरून जात होते.  कुरुळी गावातील स्पायसर चौक ते अराई चौकदरम्यान आला असता आरोपी चालवत असलेल्‍या टेम्‍पोने रचितच्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रचित गंभीर जखमी होऊन त्‍यातच त्‍याचा मृत्‍यू झाला. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गृहकर्जाच्‍या बनावट कागदपत्रांवरून ४८ लाखांची फसवणूक

सदनिका खरेदीच्या बहाण्याने बनावट मागणी पत्र तयार करुन त्‍याद्वारे ४८ लाखांचे कर्ज घेत बँकेचीच फसवणूक केल्याची  घटना पिंपरी येथे उघडकीस आली. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक अतुलकुमार लाल विरेंद्र विक्रम सिंग ( वय ४३, औंध, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने किवळेतील इमारतीमधील सदनिका एका व्यक्तीकडून खरेदी केल्याचा ठराव केला. त्याप्रमाणे २० टक्के रक्कम रोख स्वरुपात आणि उर्वरित पैसे कर्ज काढून देण्याचे ठरविले. आरोपींनी आपसात संगनमत करून या इमारतीमधील सदनिकेचा खरेदी करार दाखविला. बनावट मागणी पत्र तयार केले. त्यावर मालक म्हणून खोटी स्वाक्षरी केली. त्‍याआधारे बँक ऑफ इंडियाच्या पिंपरी शाखेतून ४८ लाखांचे गृहकर्ज मंजूर करुन घेतले. ही रक्कम सेवा विकास बँकेत वळती करुन घेत बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.