पुणे : राज्यात करोनामुळे मागील २४ तासांत तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात पुणे, सांगली आणि ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या तिन्ही रुग्णांनी करोना लशीच्या दोन मात्रा घेतल्या होत्या, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील करोना रुग्णाचा मृत्यू १२ जानेवारीला खासगी दवाखान्यात झाला असून, त्याचे वय ४९ वर्षे होते. तसेच त्याला स्तनाचा कर्करोग, न्यूमोनिया आणि सेप्टीसीमिया आदी आजार होते. ठाण्यातील करोना रुग्णाचा मृत्यू ११ जानेवारीला शासकीय रुग्णालयात झाला असून, त्याचे वय ७३ वर्षे होते. त्याला मधुमेह आणि रक्तदाब हे आजार होते. सांगलीतील करोना रुग्णाचा मृत्यू १३ जानेवारीला शासकीय दवाखान्यात झाला असून त्याचे वय ५९ वर्षे होते. त्याला कोणत्याही सहव्याधी नव्हत्या. या तिन्ही रुग्णांनी करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या, अशी माहिती आरोग्य सहसंचालक डॉ. आर.बी.पवार यांनी दिली.

राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचे सर्वाधिक १५० रुग्ण पुण्यात आहेत. राज्यातील जेएन.१च्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के पुण्यात आहेत. त्याखालोखाल नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली ७, ठाणे ७, जळगाव ४, अहमदनगर ३, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, कोल्हापूर २, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, अकोला १, रत्नागिरी १, सातारा १, सिंधुदुर्ग १ आणि यवतमाळ १ अशी रुग्णसंख्या आहे.

हेही वाचा : करोनावर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेणे योग्य आहे का? वाचा…

राज्यात ३५ नवीन रुग्ण

राज्यात मागील २४ तासांत करोनाच्या ३५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ६० रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के असून, मृत्युदर १.८१ टक्के आहे. राज्यात मागील २४ तासांत २ हजार ३८२ चाचण्या झाल्या. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर १.४६ टक्के आहे, असे डॉ.पवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona risk increasing deaths know how many patients in maharashtra pune print news stj 05 pbs
First published on: 15-01-2024 at 20:48 IST