राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यात आज दिवसभरात 78 बाधित रुग्ण आढळले. तर आता पुणे शहराची रुग्ण संख्या 1 हजार 217 इतकी झाली आहे. तसेच आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 75 जणांचा बळी गेला आहे. 14 दिवसानंतर टेस्ट निगेटिव्ह आलेल्या 11 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज पर्यंत एकूण 176 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे विभागात आज अखेर 1 हजार 457 एवढी करोनाची रुग्ण संख्या झाली आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. तर याच दरम्यान आज अखेर 88 करोना बाधित रुग्णांचा बळी गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले , पुणे जिल्हयात 1 हजार 319 बाधीत रुग्ण असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सातारा जिल्हयात 33 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आहेत. या सर्व जिल्ह्याची आकडेवारीवरून पुणे विभागाची आज अखेर 1 हजार 457 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज अखेर 88 करोनाबाधित रुग्णांचा बळी गेला असून दुसर्या बाजूला 14 दिवसा नंतर तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने 230 जणांना आज अखेर घरी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात करोनाचे ५२२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ८५९० एवढी झाली आहे. आज करोनामुळे २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे. २४ तासात ९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.