पुण्यात तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात या तिघांवर उपचार सुरु होते. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृतांमधील एका महिलेचं वय ६४ असून दुसऱ्या महिलेचं वय ४८ वर्ष आहे. तर पुरुषाचं वय ३८ वर्ष आहे. तिन्ही रुग्णांना इतर व्याधीचांही त्रास होता. ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू रविवारी रात्री ९.३० वाजता झाला. तर इतर दोघांचा मृत्यू सोमवारी झाला असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. यासोबत पुण्यातील करोनाबाधितांची संख्या १ हजार ३१९ झाली असून मृतांची संख्या ८० झाली आहे.

पुण्यात रविवारी दिवसभरात ७२ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. यामुळे पुणे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ११३९ इतकी झाली. राज्यात सध्या करोनाचे एकूण ८०६८ रुग्ण आहेत. रविवारी करोनाचे ४४० नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत एकूण ११८८ रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

रविवारी राज्यात १९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. १९ पैकी १२ मृत्यू मुंबईत, पुण्यात ३, जळगावात २, सोलापूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ मृत्यू झाला. आत्तापर्यंत ११८८ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. रविवारी झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण होते तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील होते तर २ रुग्ण ४० वर्षांखालील होते. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले.