पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार झालेला गुंड नीलेश घायवळ हा युरोपात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.

‘घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांनी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे, तसेच ब्ल्यू काॅर्नर नोटीसही बजाविण्यात आली आहे’, असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

घायवळ बनावट पारपत्राद्वारे परदेशात गेल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्याचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. सचिन घायवळ याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

नीलेश घायवळला ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी रेड काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आली. पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटनेला (इंटरपोल) पत्र पाठविले आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्याप्रकरणी घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून, बनावट पारपत्र मिळवून तो युरोपात गेल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. तो ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने ‘तत्काळ’ पारपत्र मिळविले आहे. ‘घायवळ’ ऐवजी ‘गयावळ’ नावाचा वापर करुन त्याने बनावट कागदपत्राच्या आधारे पारपत्र काढले आहे.