कॉटनच्या साडय़ा, ड्रेस मटेरिअल किंवा कुडते यात साऊथ कॉटनचे वर्चस्व पूर्वीपासून राहिले आहे. कॉटनच्या देशभर विस्तारलेल्या दक्षिणी बाजारपेठेत खास पुण्याची अशी पूना साडीआली आणि फिक्या, ताज्यातवान्या रंगांसह तिने पुणेकरांसह बाहेरच्या खरेदीप्रेमींचेही मन जिंकण्यास सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कापड किंवा तयार कपडय़ांच्या विक्रीची अनेक प्रसिद्ध दुकाने असलेले पुणे हे कापडनिर्मितीचे केंद्र मात्र कधीच नव्हते. अशा ठिकाणी आंध्र प्रदेशातून पद्मशाली विणकर समाजातील एक कुटुंब आले आणि त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायातून ‘पूना साडी’ असा कॉटन साडय़ांचा ‘ब्रँड’ तयार झाला. या ‘पूना साडी’चे जनक सुभाष कुंदेन. त्यांच्या आधी त्यांचे वडील नरसय्या सय्याना कुंदेन यांनी ही परंपरा सुरू केली होती.

कुंदेन कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. पद्मशाली समाजातील. या समाजातील बहुसंख्य लोक पूर्वीपासून आणि आजही कापड व्यवसायातच आहेत. १९३०च्या सुमारास अनेक पद्मशाली कुटुंबे पुण्यात स्थलांतरित झाली. त्यातच नरसय्या कुंदेन हेही आले. आधीपासून घरात विणकाम होतेच, त्यामुळे पुण्यात भवानी पेठेतील त्यांच्या घरी हातमाग सुरू झाले. अगदी सुरुवातीला त्यावर फक्त खादीचे कापड विणले जाई. हळूहळू १९६० पासून नरसय्या कुंदेन यांनी साडय़ा विणण्यास सुरुवात केली. या साडय़ांना ‘पूना साडी’ ही ओळख सुभाष कुंदेन यांनी दिली.

सुती किंवा कॉटनच्या साडय़ा बाजारात नवीन नाहीत. दक्षिणेकडून येणाऱ्या कॉटन साडय़ा प्रचंड खपतात. तरीही पुण्यात बनणारी म्हणून ‘पूना साडी’ असे नामकरण झालेल्या साडीची स्वत:ची काही वैशिष्टय़े आहेत. कॉटन, आर्ट सिल्क किंवा दोन्ही धागे मिळून बनलेल्या या साडय़ा आहेत. तरी त्यातील कॉटनच्या साडय़ा विशेष लोकप्रिय. संपूर्ण साडी एकाच रंगाची आणि त्याला जरीचे, पण बटबटीत न वाटणारे काठ हे पूना साडीचे लक्षात राहणारे रूप. या काठांमध्ये ‘टेंपल बॉर्डर’ नक्षी प्रमुख्याने दिसते. दक्षिणेकडच्या कॉटन साडय़ा आणि पूना साडी यातील दुसरा फरक म्हणजे त्यांचे रंग. दक्षिणेकडे गडद रंग अधिक खपतात. महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या आवडीचा विचार करून कुंदेन यांनी गडद रंगांबरोबरच फिकट, पण ताजेतवाने वाटणारे रंग कॉटन साडय़ांमध्ये आणले. पारंपरिक प्रकारची नारायणपेठ साडी पूना साडीच्या ब्रँडखाली येते तेव्हा त्यात आकर्षक फिकट रंगही मिळतात. केवळ पूना साडय़ांवरच कुंदेन थांबले नाहीत. १९८०-८४च्या सुमारास ते साडय़ांपासूनच काठांचे ड्रेस मटेरिअल तयार करू लागले. त्या वेळी पंजाबी ड्रेस वापरले जात होते, पण आताप्रमाणे बहुसंख्य स्त्रिया ते वापरत नसत. त्यामुळे पूना ड्रेस मटेरिअलच्या विक्रीत प्रथम अडचणी आल्या.

आधी कुंदेन यांचा साडय़ांचा व्यवसाय फक्त पुण्यात चाले, पण त्या वेळी स्थानिक पातळीवर स्पर्धा असल्यामुळे पुण्याच्या बाहेर व्यवसाय वाढवण्याची गरज वाढली. मुंबई, दक्षिण भारत अशा ठिकाणी विपणन सुरू झाल्यावर कुंदेन यांच्या साडय़ांना मागणी वाढू लागली. पुण्याबाहेर जाण्याचा आणखी एक फायदा त्यांना झाला, तो म्हणजे बाजारात नेमके काय खपते, बाहेरच्या ग्राहकाला काय हवे आहे, हे ओळखून त्यांनी उत्पादनात तसे बदल करायला सुरुवात केली. कुंदेन यांच्या मागे-पुढे पुण्यात स्थलांतरित झालेल्या अनेक साडी विणकरांना बाजाराची नेमकी गरज जाणून घेता न आल्याचा फटका बसत होता. विणकाम कामगार उपलब्ध न होणे, विणकरांची पुढची पिढी या व्यवसायात येण्यास इच्छुक नसणे अशा कारणांमुळे १९८०च्या दशकापर्यंत अनेक हातमाग बंद पडले. त्यानंतर पुण्यात स्वत:ची कापडनिर्मिती करणाऱ्यांपैकी कुंदेन हेच प्रमुख कुटुंब उरले.

कुंदेन यांची तिसरी पिढी म्हणजे सुनील कुंदेन आणि अनिल कुंदेन हे याच व्यवसायात आले. सुनील कुंदेन हे ‘टेक्स्टाईल’ या विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतलेले. एकाच रंगाच्या किंवा चौकोन-चौकोनाच्या (चेक्स) नक्षीच्या साडय़ांबरोबर त्यांनी बाजाराचा ‘ट्रेंड’ ओळखून नवीन ‘प्रिंट्स’ आणली. विणलेल्या कापडाचा धुताना रंग जाणार हे ग्राहकांनी गृहीतच धरलेले असते. पूर्वी कापड प्रामुख्याने हातानेच रंगवले जाई. त्यात अधिक रंग जाणे, सगळीकडे रंग एकसारखा न बसणे अशा काही व्यावसायिक अडचणी येत. आता पूना साडय़ांचे कापड मुंबईतून यांत्रिक पद्धतीने रंगवून घेतले जाते. ‘त्यात कापडाची गुणवत्ता अधिक चांगली दिसते आणि रंग जाण्याचे प्रमाण कमी होते. शिवाय आधी कापडासाठी रासायनिक रंग वापरले जात, आता ते वापरले जात नाहीत,’ असे सुनील कुंदेन सांगतात. पुण्यात थेऊरमध्ये ‘श्री चिंतामणी इंडस्ट्रिअल इस्टेट’ येथे या साडय़ा आणि ड्रेस मटेरियल बनतात. तिथे त्यांचे ‘फॅक्टरी आऊटलेट’देखील आहे. बाहेर ते किरकोळ कापड दुकानदारांमार्फत माल विकतात. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये या साडय़ा व ड्रेस मटेरिअल विशेष खपतात. तामिळनाडू, दिल्ली, पंजाब या ठिकाणी त्यांचा माल जातो. नल्ली, पोती, कुमरन अशा दक्षिणेकडील प्रसिद्ध साडी दुकानांमध्येही कुंदेनची पूना साडी मिळते.

‘पूना साडी’ किंवा ‘पूना ड्रेस मटेरिअल’ या नावासह ‘ब्रँडिंग’ वाढवण्याचे आता त्यांचे प्रयत्न आहेत. एप्रिलपासून ते कॉटनचे कुडतेही बाजारात आणणार असून, सोशल मीडियामधून लोकांपर्यंत पोहोचणे आणि कुडत्यांच्या ‘ऑनलाइन’ विक्रीत उतरणे हे पुढील उद्दिष्ट असल्याचे सुनील कुंदेन सांगतात.  कांजीवरम, गढवाल, माहेश्वरी, पैठणी अशा विविध शहरांची शान बनलेल्या उंची साडय़ांच्या मांदियाळीत ‘पूना साडी’ हे नाव छोटे वाटेल. पण कॉटनच्या दक्षिणी वळणाच्या साडय़ांना या साडय़ांनी एक महाराष्ट्रीयन ओळख दिली. ही ओळख महाराष्ट्राबाहेर, अगदी दक्षिणेतही पोहोचली आणि खरेदीची आवड असणाऱ्या असंख्य जणींनी दक्षिणी कॉटनबरोबर पुण्याच्या या साडय़ांना आपल्या कपाटात प्रेमाने स्थान दिले.

sampada.sovani@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cotton saree
First published on: 23-03-2017 at 02:54 IST