पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे १८ कोटी ४४ लाख ४३१ हजार रुपयांचे धनी आहेत. त्यांनी मुलगा ऋषीकेशला एक कोटी २५ लाखांचे कर्ज, तर पत्नी उषा यांना ९७ लाख तात्पुरते कर्ज (हातउसने) दिले आहेत. निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा >>> भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला घेणार – रोहित पवार; अजित पवार यांना लगावला टोला
संजोग वाघेरे यांच्यावर आंदोलनाचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे एक लाख ५४ हजार ३१२ रुपये तर पत्नी उषा वाघेरे यांच्याकडे एक लाख ४६ हजार ५१० रुपयांची रोक रक्कम आहे. बँक खात्यातील ठेवी, शेअर्स असून त्यांनी मुलगा ऋषीकेशसह ११ जणांना त्यांनी कर्ज दिले. त्यांच्याकडे २१ लाख ७६ हजार ५७१ रुपयांचे सोने आहे. तर, ५० हजार ४९० रुपयांचे एक पिस्तूल देखील आहे. त्यांची चार कोटी ४६ लाख ३६ हजार ४९४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पिंपरी वाघेरेत दोन कोटी २५ लाखांची बिगरशेत जमीन, वाकडला एक आणि पिंपरीत चार अशा पाच निवासी मिळकती असून, सहा कोटी ८५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे.
हेही वाचा >>> पुणे : मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग
पत्नी उषा वाघेरे यांच्याकडे एक कोटी ८९ लाख ६३ हजार ११५ रुपयांची जंगम तर भोसरी एमआयडीसीतील एक वाणिज्यिक इमारतीसह पाच कोटी २० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दोघांकडे एकही मोटार नाही. संजोग यांच्यावर विविध बँकांचे ६४ लाख ४८ हजार २७१ रुपये तर पत्नी उषा यांच्यावर पवना बँकेचे एक कोटी १५ लाख ५१ हजार ३१४ रुपये आणि पती संजोग यांच्याकडून हातउसने घेतलेले ९६ लाख ७९ हजार ६७२ रुपये, मुलगा ऋषीकेश याचे नऊ लाख ६५ हजार ५४४ रुपये असे एकूण दोन कोटी ३३ लाख ८४ हजार ५५१ रुपयांचे कर्ज आहे.
संजोग वाघेरे यांची संपत्ती
जंगम मालमत्ता – चार कोटी ४७ लाख ९० हजार ८०६ रुपये
स्थावर मालमत्ता – सहा कोटी ८५ लाख
एकूण – ११ कोटी ३२ लाख ९० हजार ८०६ रुपये
पत्नी उषा वाघेरे
जंगम मालमत्ता -एक कोटी ९१ लाख नऊ हजार ६२५ रुपये
स्थावर मालमत्ता- पाच कोटी २० लाख रुपये
एकूण मालमत्ता – सात कोटी ११ लाख नऊ हजार ६२५
वाघेरे कुटुंबीयांची मालमत्ता -१८ कोटी ४४ लाख ४३१ रुपये
कर्ज – दोन कोटी ९८ लाख ३२ हजार ८२२ रुपये