पुणे : कराड येथील एका दाम्पत्याला झालेली दोन बाळे जन्मानंतर काही दिवसांतच दगावली. आई–वडील दोघांकडूनही आलेल्या अनुवांशिक जनुकीय दोषामुळे या बाळांना गंभीर आजार झाला होता. यामुळे या दाम्पत्याचे अपत्यप्राप्तीचे दरवाजे बंद झाले होते. अखेर पुण्यातील डॉक्टरांनी ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’च्या (आयव्हीएफ) उपचार आणि जनुकीय तपासण्यांचा आधार घेऊन या दाम्पत्याला जनुकीय दोषमुक्त निरोगी बाळ झाले आहे.

लग्नाला दहा वर्षांहून अधिक काळ उलटूनही हे दाम्पत्य अपत्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांना झालेली दोन बाळे काही दिवसांतच दगावली होती. त्यांच्यावर ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी’ (एसएमए) या दुर्धर आजाराची छाया होती. हा आजार दोन्ही पालकांकडून पुढे सरकतो आणि अपत्याच्या जिवंत राहण्याच्या शक्यतांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अपत्य प्राप्तीमध्ये जोखीम घ्यावी लागणार हे स्पष्ट दिसत असले, तरी निरोगी अपत्य प्राप्त करण्याची या दाम्पत्याची जिद्द कायम होती. वैद्यकीय प्रगतीने या अडचणीवर मार्ग निघाला. जनुकीय तपासणी आणि सततचे वैद्यकीय मूल्यमापन यावर आधारित तयार केलेल्या उपचार योजनेमुळे या दाम्पत्याने अशक्य वाटणाऱ्या अडथळ्यांवर मात केली.

याबाबत इंदिरा आयव्हीएफ येथील आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. अमोल लुंकड म्हणाले की, ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी’सारख्या जनुकदोषातून मार्ग काढणे म्हणजे केवळ वंध्यत्वावर उपचार करणे नसते, तर व्यापक उपचार योजना, काटेकोर वैद्यकीय देखरेख आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन आवश्यक असते. आम्ही जनुकीय तपासण्या केल्या आणि रुग्णांना विश्वासात घेतले. त्यातून पालकत्वाकडे जाणारा त्यांचा प्रवास सुरू झाला. अखेर हा प्रवास निरोगी बाळाच्या जन्माने यशस्वी ठरला. आयव्हीएफचे उपचार, जनुकीय तपासणी आणि सातत्यपूर्ण देखरेख यामुळे जनुकदोषाचा धोका असलेल्या दाम्पत्यांनाही पालकत्वाचा सुरक्षित व विश्वासार्ह मार्ग उपलब्ध होतो.

उपचारातील महत्त्वाचे टप्पे

  • दाम्पत्याचा वैद्यकीय इतिहास तपासून, त्यांच्या अनुवांशिक आजाराची तपासणी.
  • अनुवांशिक आजारामुळे निर्माण होणारी जोखीम समजावून सांगण्यासाठी समुपदेशन.
  • प्रयोगशाळेत भ्रूण तयार करून त्याची जनुकीय तपासणी.
  • दोष निर्माण होऊ शकणारे भ्रूण वगळले.
  • निरोगी भ्रूणाची निवड करून गर्भाशयात प्रत्यारोपण.
  • या उपचारांनंतर अखेर निरोगी बाळाचा जन्म.