पुणे: किमान साधनांमध्ये आयुष्य जगणाऱ्या आदिवासींना आधुनिक ज्ञान आणि सेवासुविधा मिळण्यासाठी शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. केवळ शहरांपुरता विकास करून चालणार नाही, तर तो ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागापर्यंत न्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पावले उचलली जातील, असे सांगत राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आदिवासी विद्यापीठ स्थापनेचे संकेत दिले. या विद्यापीठाचा उद्देश आदिवासींना आदिवासी ठेवण्याचा नसून, जगाशी स्पर्धा करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित करण्याचा आहे, असे त्यांनी नमूद केले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात राधाकृष्णन बोलत होते. विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. यशोधरा व्ही. हरीभक्त, सीओईपीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गिते या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>राष्ट्र्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची रणधुमाळी सुरू; इच्छुक उमेदवारांनाकडून अर्ज मागविले

राधाकृष्णन म्हणाले, की जग वेगाने बदलत असताना वर्षानुवर्षे एकच अभ्यासक्रम सुरू ठेवता येणार नाही. बाजारपेठेच्या गरजा, मागणीशी सुसंगत अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. त्यासाठी थिअरी आणि प्रात्यक्षिक यात समन्वय गरजेचा आहे. वेगवेगळ्या विषयांची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विद्याशाखा, अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणे आवश्यक आहे. देशासमोरील गरिबी, बेरोजगारी, ऊर्जा, पाणीटंचाई, सुरक्षितता अशा आव्हानांवर नावीन्यता, संशोधन, उद्यमशीलतेद्वारे मात करणे गरजेचे आहे. सीओईपी विद्यापीठासारख्या संस्थांद्वारे स्वावलंबी भारत घडवणे शक्य आहे.

सीओईपीने जागतिक दर्जाची संस्था म्हणून आपले स्थान उंचावण्यासाठी केपीएमजीसारख्या व्यवस्थापन संस्थेशी करार केला आहे. पुण्यातील अभियांत्रिकी शिक्षणासाठी सीओईपी विद्यापीठाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते ही अभिमानास्पद बाब आहे, अशी भावना डॉ. चौधरी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>सोनगिरी, मीरगड हे दोन वेगळे गड; इतिहास संशोधक राज मेमाणे यांचे संशोधन

वाचनासाठी एक तास देणे आवश्यक

विद्यार्थी लॅपटॉपवर अनेक तास अभ्यास करतात. मात्र स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी, नवीन ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज एक तास छापील पुस्तक वाचण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असेही राधाकृष्णन यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१.४ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती ३३० विद्यार्थ्यांना प्रदान

डॉ. भिरूड यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल मांडला. विद्यापीठातील नवीन ग्रंथालय, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. विद्यार्थी कल्याण मोहिमेअंतर्गत १०५ विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. ३३० विद्यार्थ्यांना १.४ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. पदवीच्या ७९ टक्के विद्यार्थ्यांना, तर पदव्युत्तरच्या ४७ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळाली. त्यात ८७ लाख रुपये सर्वाधिक पॅकेज होते, असे त्यांनी सांगितले.