लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पात्रात राडारोडा टाकणाऱ्या एका महिलेसह चौघांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राडारोडा टाकून नदी प्रदूषित केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

संभाजी निवृत्ती नढे (वय ६४), तुकाराम दामोदर नढे (वय ५५), गणेश ज्ञानेश्वर नढे (वय ३५, सर्व रा. काळेवाडी) आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महापालिकेचे आरोग्य निरीक्षक अमोल गणपत गोरखे (वय ४७, रा. आकुर्डी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-मतदानाला सुट्टी न देणे महागात पडणार

आरोपींनी गट नंबर ९६ रहाटणी, काळेवाडी येथील पवना नदीपात्रामध्ये बांधकामाचा राडारोडा टाकला. यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर केला आहे. त्यामुळे आरोपींवर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम ३, १५ नुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रामध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नदी पात्र अरुंद होत आहे. राडारोडा टाकणाऱ्यांवर महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. राडारोडा टाकणाऱ्यांकडून एक लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.