पिंपरी : दोन वाहने रस्ता दुभाजकाशेजारी बेकायदेशीरपणे पार्क करून रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना आणि वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार (२६ जुलै) रोजी दुपारी पिंपरी येथील भोला हॉटेलसमोरील के.एस.बी. चौक ते थरमॅक्स चौक या रोडवर घडली.
या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल बडक यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील दोन वाहने के.एस.बी. चौक ते थरमॅक्स चौक या रोडवर रस्ता दुभाजकाशेजारी पार्क करून रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना व वाहनांना अडथळा निर्माण केला. वाहने रस्त्यावरून काढण्याबाबत पोलीस शिपाई अमोल बडक यांनी सांगितले असता, त्याने पोलिसांशी अरेरावीची भाषा वापरून “मी गाड्या काढत नाही, तुम्हाला काय करायचे आहे ते करून घ्या, तुम्हाला काय अधिकार आहे गाड्या काढण्याचा” असे बोलून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
वाकडमध्ये शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक
बनावट शेअर मार्केट ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून आणि वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगून एक कोटी ७ लाख ३७ हजार ८८५ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी एका व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन व्यक्ती तसेच नऊ बँक खाते धारक व ऍप्लिकेशन धारक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना आरोपीने एका व्हॉट्सॲप समूहात समाविष्ट केले. त्यावर एक लिंक पाठवून त्याद्वारे फिर्यादींना एक बनावट शेअर मार्केट ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. व्हॉट्स अप ग्रुपचे ॲडमिन असलेल्या आरोपीने त्या ॲपद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून शेअर ट्रेडिंगकरिता वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एकूण चार कोटी इतका आभासी परतावा आरोपींनी फिर्यादीला दाखवला. तसेच फिर्यादींना त्यांची रक्कम काढण्याकरिता वेगवेगळे सर्व्हिस चार्ज, सर्व्हिस टॅक्स भरण्यास सांगितले. यामध्ये आरोपींनी एकूण एक कोटी ७ लाख ३७ हजार ८८५ रुपये रक्कम भरण्यास भाग पाडून ते पैसे परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.
मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुनावळे येथे वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू झाला. सतीश चंद्रशेखर निघोजकर (वय ४३, तळेगाव दाभाडे, मावळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी उदय मधुसूदन देशमुख (४३, घोडबंदर रोड, मुंबई) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांचे मेहुणे निघोजकर हे त्यांच्या दुचाकीरून कामावरून घरी जात होते. पुनावळे येथे पवना नदी पुलावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निघोजकर यांचा मृत्यू झाला. आरोपी वाहन चालक अपघाताची माहिती न देता निघून गेला. रावेत पोलीस तपास करत आहेत.
चिखलीत जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा
पत्त्याच्या पानावर फ्लॅश नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पत्त्याच्या पानावर फ्लॅश नावाचा जुगार पैसे लावून खेळत होते. या जुगार अड्ड्याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १६४० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.