Pune Crime Rise : पुण्यातल्या नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या बाजीराव रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका १७ वर्षांच्या अल्पवयीनाचा दुपारी सव्वातीन वाजता खून झाला आणि पुणे पुन्हा हादरले. या खुनाच्या गुन्ह्यात पकडलेले आरोपीही अल्पवयीन असल्याने हा हादरा आणखी जास्त जाणवला. ज्या प्रकारे मुलग्यावर तीक्ष्ण, धारदार शस्त्रांनी वार केले होते, ते कदाचित निर्घृण या शब्दालाही लाजवतील. घटनास्थळी सांडलेल्या रक्ताची छायाचित्रे हेच सांगतात. पुणे, गुन्हे आणि त्यातील अल्पवयीनांचा सहभाग हा गंभीर चिंतेचा आणि चिंतनाचाही विषय यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याची सर्वंकष चर्चा करताना अपुरे पोलीस, पोलिसिंग, गुन्हेगारांचे उदात्तीकरण आदी मुद्द्यांची चर्चा तर व्हायलाच हवी, पण नियमाविरुद्ध वागणे ही सवयच पुण्यात अंगवळणी पडते आहे का, या यातील व्यापक प्रश्नालाही भिडायला हवे.
सत्तरच्या दशकात पुण्यात गाजलेल्या जोशी-अभ्यंकर खून प्रकरणाला पुढील वर्षी ५० वर्षे होतील. खूनसत्राची ही मालिका त्या काळातील अनेक पुणेकरांच्या अजूनही लक्षात आहे आणि नव्या पिढीला त्याची माहिती आता लेख, पॉडकास्ट आदी स्वरूपात मिळत असते. ‘सुरक्षित शहर’ या लौकिकाला एका अर्थाने गेलेला हा पहिला तडा होता. तेथून गेल्या अर्धशतकात या शहराचे रोज स्खलन होत आहे, आणि त्याचा वेग गेल्या पाव शतकात चक्रावून सोडणारा आहे. ज्या पुण्याची ख्याती रात्री उशिराही मुली बिनधोकपणे रस्त्यावरून दुचाकी चालवत आपल्या कामावरून घरी जाऊ शकतात, अशी होती, त्याची अधोगती भर दुपारी मध्य वस्तीतील बाजीराव रस्त्यावरही खून होऊ शकतो, या असुरक्षिततेपर्यंत पोचली आहे.
Crime in Pune : पुण्यातील गुन्हेगारीचे स्वरूप
पुण्यातील गुन्हेगारीचे ढोबळ मानाने वर्गीकरण केले, तर दिसते, की चोरीच्या गुन्ह्यांत प्रामुख्याने साखळीचोरी आणि घरफोड्या मोठ्या प्रमाणात होतात. खुनाच्या घटनांत टोळ्यांतील वैमनस्य हा प्रमुख घटक आहेच, पण किरकोळ वाद किंवा प्रेमप्रकरण, अनैतिक संबंधांचा संशय यामुळे होणारे खूनही वाढले आहेत. याशिवाय बलात्कार, विनयभंग, मारहाण असे गुन्हेही नित्य घडतात. या वर्षीची जानेवारी ते जून २०२५ पर्यंतची आकडेवारी सांगते, की पुण्यात सहा महिन्यांत ४४ खून, ९३ खुनाचे प्रयत्न आणि ९१ साखळीचोरीचे गुन्हे नोंद झाले आहेत. विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या ४६७, तर किरकोळ कारणांवरून मारहाण झाल्याच्या गुन्ह्यांची संख्या ७७१ आहे. ‘सुरक्षित’ मानल्या गेलेल्या शहरात महिन्याला सात खून आणि १५ खुनाचे प्रयत्न होत असतील, तर येथील नागरिकांसाठी प्रत्येक दिवस किती ‘जीव’घेणा आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.
Crime in Pune : काय कमी पडते आहे?
साखळीचोरीचे महिन्याला १५ गुन्हे, हा साखळीचोरांचे धाडस वाढल्याचा सांगावा आहे. सकाळी, दुपारी, सायंकाळी कोणत्याही वेळी हे गुन्हे कोणत्याही रस्त्यावर घडतात, हा आणखी गांभीर्याचा मुद्दा. पोलिसांनी रात्रगस्तीबरोबर दिवसाही सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बीट मार्शलद्वारे गस्त घालणे सुरू केले आहे. तरीही या प्रकारचे गुन्हे घडतात, हे पोलिसिंगचे अपयश आहे. जुने पोलीस अधिकारी सांगतात, त्याप्रमाणे पोलिसांचा नागरिकांशी असलेला संपर्क कमी झाल्याचाही हा परिणाम आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान मदतीला असले, तरी प्रत्येक भागातील काही प्रतिष्ठित, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच ज्येष्ठ नागरिकांना नेहमी भेटणे, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावून नागरिकांशी संवाद ठेवणे, हे अलीकडे कमी होत आहे. त्यामुळे त्या-त्या भागाची बित्तंबातमी मिळण्यात मर्यादा येतात. अर्थात, सातत्याने निघत असलेल्या मिरवणुका, मंत्र्यांचे दौरे, सण-उत्सवांचे बदललेले स्वरूप यामुळे एकूण कायदा-सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांवर येत असलेला ताणही याला मर्यादा आणणारा मोठा घटक आहे, हे नाकारून चालणार नाहीच. त्यात ५० लाखांच्या जवळपास लोकसंख्या गेलेल्या या पुणे शहराला केवळ साडेनऊ हजार पोलिसांचा फौजफाटा उपलब्ध असल्याचा फटकाही बसतो.
Crime in Pune : सामान्यांना धास्ती
पुणे पोलीस दलाने कुख्यात गुंडांची हजेरी आणि कोयते नाचवून दहशत निर्माण करणारे, किरकोळ कारणांसाठी गाड्यांची तोडफोड करणारे यांची धिंड काढून गुन्हेगारांमध्ये ‘योग्य’ तो संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण, अलीकडच्या काळात गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी संगणक अभियंत्याला रस्त्यावरच्या भांडणातून केलेली मारहाण, नीलेश घायवळच्या टोळीतील गुंडांनी अशीच किरकोळ कारणांवरून खुनाच्या प्रयत्नापर्यंत मारलेली मजल ही उदाहरणे पोलिसांचा वचक आहे का, असा प्रश्न निर्माण करणारी ठरतात. तसेच, गुंडांना राजकीय वरदहस्त आहे, या सामान्यांच्या मनातील शंकेलाही नकळत पुष्टी देतात. वनराज आंदेकरचा खून, त्याचा बदला म्हणून अलीकडे झालेले दोन खून हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याचे मानण्यास वाव देते. या प्रकारांमुळे सामान्य पुणेकर भीतीच्या छायेखाली वावरतो आहे, हे लक्षात घ्यायला हवे. रस्त्यात भले आपण बरोबर असताना कुणाशी कधी वाद झाला, तरी आपलाच जीव जाऊ शकतो, इतकी ही धास्ती खोलवर रुजली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुंडगिरीचा बीमोड करण्याची केलेली सूचना आणि आपले नाव वापरून गैरप्रकार करणाऱ्यांनाही सोडू नका, हे सांगणे स्वागतार्ह. फक्त उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही काही काळापूर्वी गुंडगिरी ठेचून काढण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतरही पुण्यात गजबजलेल्या वेळांना खून झाले आहेत, हे विसरता येत नाही. सामान्य पुणेकराच्या मनातील भीती उत्तम ‘पोलिसिंग’द्वारेच कमी होऊ शकते. आगामी काळ महापालिका निवडणुकांचा आहे, हे लक्षात घेता, तर हे अधिक महत्त्वाचे.
Crime in Pune : बदलत्या पुण्याची स्पंदने
हे झाले पोलिसिंग आणि राज्यकर्त्यांच्या मर्यादा याबाबतचे विश्लेषण. पण, या पलीकडे याला काही सामाजिक पदरही आहेत. शिक्षणाच्या उत्तम सुविधा, चांगले हवामान, मुबलक पाणी, सांस्कृतिक वातावरण ही पुण्याची आकर्षणे. गेल्या काही वर्षांत राज्याच्या विविध भागांतून आणि राज्याबाहेरूनही अनेकजण पुण्यात येऊन स्थायिक झाले. शिक्षणानिमित्ताने येणारे विद्यार्थी, उद्योगांतील नोकऱ्यांनिमित्त येणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, निवृत्तीनंतर येणारे प्रशासकीय सेवेतील, लष्करी सेवेतील अधिकारी अशा विविध घटकांचा त्यात समावेश आहे. या सगळ्यात पुणे विस्तारत गेले, येथील आर्थिक उलाढाल वाढली, वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार निर्माण झाले आणि आधुनिकताही आली. पण, त्याच वेळी पुण्यातील ४० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात, हे वास्तव फारसे बदलले नाही. याचा अर्थ आर्थिक चलनवलन वाढत असतानाही आर्थिक भेदही टोकाचेच राहिले. हा आर्थिक भेद फक्त श्रीमंत आणि गरीब अशा दोनच पातळ्यांवर नाही, तर मध्यमवर्गात झालेल्या उपवर्गांतही झिरपला. उदाहरणार्थ, शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच आर्थिक वर्गात असलेल्या दोन तरुणांच्या आर्थिक स्थितीत ते काम करित असलेल्या क्षेत्रामुळे फरक पडला. म्हणजे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्याचे वेतन आणि अन्य क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्याचे वेतन यातील तफावत मोठी राहिली. यातून रुजत गेलेली वर्गीय स्पर्धा आणि पैसे मिळविण्याची आकांक्षा या गोष्टीही झटपट संपन्नता मिळविण्याच्या प्रक्रियेला काही प्रमाणात गुन्हेगारीकडे घेऊन गेल्या. पुण्यातील गुंतवणुकीच्या आमिषाने झालेले आर्थिक गुन्हे पाहिले, तर ते याकडे अंगुलीनिर्देश करतात.
Crime in Pune : संयमच न राखण्याची वृत्ती
आकांक्षांचे हे क्षितिज विविध वर्गांत वेगवेगळ्या पद्धतीने खुणावते. कुणाला कुणाची ऐषोरामी जीवनशैली खुणावते म्हणून तो गुन्हेगारी मार्गाला जातो, कुणाला ‘भाई’गिरी हे त्याच्या परिसरात, अवतीभवती त्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे साधन वाटते म्हणून तो गुन्हेगारीकडे वळतो, तर कुणी पोटची भूक भागविण्यासाठीही यात पडतो. पुण्यात अलीकडे झालेल्या गर्दीने आणखी एक प्रकारची वृत्ती निर्माण केली, ती संयमच न राखण्याची. वाहतूक कोंडीतून पुढे जाण्याच्या धडपडीपासून आयुष्यात आलेल्या प्रत्येक समस्येला तातडीने उत्तर मिळविण्याच्या घाईपर्यंत त्याचे वेगवेगळे पापुद्रे उलगडता येतात. या घाईचे रूपांतर सर्व प्रकारचे नियम मोडण्यात, म्हणजेच पर्यायाने गुन्ह्यांत झालेले दिसते. रात्री-अपरात्री दारू पिऊन भरधाव गाड्या चालवताना झालेले अपघात, रस्त्यावरून आजूबाजूच्यांची फिकिर न करता बेदरकारपणे वेगाने जाणाऱ्या दुचाक्या, एका दुचाकीवरून तीन-चार जण बसून कर्णकर्कश हॉर्न वाजवत जाणे, दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालणे, बसमध्ये, रस्त्यावरून चालताना मुलींची छेड काढणे, वाढदिवसाच्या नावाखाली मध्यरात्री फटाके फोडून, धिंगाणा करून नागरिकांची झोपमोड करणे आणि विरोध करणाऱ्यांना दटावणे हे काही फक्त गुंडच करतात असे नाही. नियम मोडल्याचा सराव असलेला हे धाडस करू धजतो, हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक नियमभंगाला कठोर शिक्षा हाच त्यावरचा उपाय आहे आणि तो काटेकोरपणे राबवायलाच हवा.
siddharth.kelkar@expressindia.com
