पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या आंदोलकांवर पुणे पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार रविवारी सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून या संघटनेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना दिल्या. संघटनेवर बंदी घालण्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलनावेळी पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. त्याचे शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत. यासंदर्भात भाजपने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि युवा सेनेकडून आंदोलने करण्यात आली. फडणवीस यांनी याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांशी चर्चा केली. प्राथमिक तपासानुसार १५३ (अ), (दोन गटात व धर्मात तेढ निर्माण करणे), १५३ (ब), (देशाच्या अखंडतेवर प्रतिकूल प्रभाव टाकणारी बदनामीकारक वक्तव्ये), १०९ (गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे) आणि १२० (ब), (कट रचणे) अशी विविध कलमे ‘पीएफआय’वरील गुन्ह्यात अंतर्भूत करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल पाटील यांनी दिली. ही चित्रफित न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आली असून, अहवालानंतर पुढील गुन्ह्यांबाबत निर्णय घेण्यात येईल.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना केंद्रीय आणि राज्यातील तपास यंत्रणेने गुरुवारी ताब्यात घेतले. त्याच्या निषेधार्थ पुण्यात शुक्रवारी ‘पीएफआय’ संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले होते. त्या वेळच्या प्रसारित झालेल्या चित्रफितीमध्ये आंदोलक विविध घोषणा देताना दिसत आहेत. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया जिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. दरम्यान, या आंदोलनाच्या वेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचा दावा करीत चित्रफीत प्रसारित झाली होती. त्याचबरोबर ‘एनआयए’च्या कारवाईच्या निषेधार्थ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घोषणाबाजी केली. मात्र, या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी बेकायदा आंदोलन करून घोषणाबाजी केली. बेकायदा आंदोलन करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी ४१ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चित्रफितीची न्यायवैद्यक तपासणी

‘पीएफआय’च्या आंदोलनप्रकरणी गुन्ह्यांच्या कलमांमध्ये रविवारी वाढ करण्यात आली. आंदोलनानंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी एक चित्रफीत प्रसारित झाली होती. त्याची सत्यता आता न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून तपासण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

परवानगी नसताना आंदोलकांनी जमाव जमवून आंदोलन केले होते. या प्रकरणात आता भादंवि कलम १५३ ए, १५३ ब, १०९, १२० ब, अशा विविध कलमांची वाढ केली असून, पुढील तपास सुरू आहे.

– प्रताप मानकर, वरिष्ठ निरीक्षक, बंडगार्डन पोलीस ठाणे.

देशविरोधी घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत. काही वर्षे सातत्याने तपास करून, पुरावे जमा करून ‘पीएफआय’वर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही राज्यात गृहमंत्री असताना त्यांच्या कृतीवर लक्ष ठेवून होतो. 

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crimes against pfi workers central government decision organization devendra fadnavis ysh
First published on: 26-09-2022 at 00:02 IST