पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगत शिवकाळ उभा करणारी आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी पाहण्यासाठी गर्दी होत आहे. इतिहासाचे वैभव दाखविणाऱ्या वास्तू, शिवचरित्रातील कथा, चित्रे, संग्रहालयातील वस्तू यांमुळे पर्यटक भारावून जात असून, १५ जुलैपर्यंत नाममात्र ५० रुपयांमध्ये शिवप्रेमींना शिवसृष्टी पाहता येणार आहे.

आशिया खंडातील सर्वांत भव्य ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या आणि आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीमध्ये अवतरलेला ‘शिवकाळ’ अनुभवण्यासाठी शिवप्रेमींकडून सध्या नाममात्र प्रवेशशुल्क आकारले जात आहे. अभय भुतडा फाउंडेशनच्या वतीने शिवसृष्टीला देण्यात आलेल्या ५१ लाख रुपयांच्या देणगीद्वारे हे शक्य झाले आहे. उन्हाळ्याची सुटी सुरू असल्याने वातानुकुलित शिवसृष्टीत शिवकाळाचा अनुभव घेता येणार आहे, असे शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.