पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात पुस्तकांचे वाचन, विविध खेळांच्या माध्यमातून नैसर्गिक बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘मुलांवर चांगले संस्कार करणाऱ्या ‘पुणे बाल पुस्तक जत्रे’त पुढील वर्षापासून सांस्कृतिक विभागाचा सहभाग असेल,’ अशी घोषणा त्यांनी केली.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महानगरपालिका, पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद यांच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ ला आशिष शेलार यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार हेमंत रासने, महापालिका उपायुक्त पृथ्वीराज बी. पी., भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, ‘चिंटू’कार चारुहास पंडित, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
शेलार म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि इंटरनेटच्या युगात लहान मुलांच्या संवेदना जागृत राहाव्यात, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांच्या गुणांचा विकास व्हावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे आहे. त्यामुळे सांस्कृतिक विभाग या बाल पुस्तक जत्रेचा अधिकृत सहयोगी होईल, राज्यात बालसंस्काराचे एक प्रारूप म्हणून हा उपक्रम ओळखला जाईल.
‘कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली असताना समाजासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेला वास्तविक बुद्धिमत्तेची जोड दिल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. मुलांमध्ये अशी बुद्धिमत्ता निर्माण करण्याची क्षमता बाल पुस्तक जत्रेत आहे. बालकांसाठी पुस्तके, खेळ, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि इतिहासाची माहिती असे सर्व एकाच ठिकाणी आहे,’ असेही शेलार यांनी सांगितले.
आशिष शेलार यांनी विटी-दांडू खेळाचा आनंद लुटला. त्यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.