पुणे : विवाहास नकार दिल्याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारच्या खुनासाठी वापरलेले कंपासमधील कटर पोलिसांनी आरोपी राहुल हांडोरे याच्याकडून जप्त केले आहे. राहुल आणि दर्शना यांनी राजगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना आरोपीने घातलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत (३ जुलै) वाढ करण्यात आली आहे.
विवाहास नकार दिल्याने राहुलने दर्शनावर कंपासमधील कटरने तीन ते चार वेळा वार केले. त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली राहुलने नुकतीच पोलिसांना दिली. त्यानुसार त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तुंची माहिती घेत त्या जप्त करण्यात येत आहेत. १८ जून रोजी दर्शना हिचा राजगडच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ती राहुलसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला २१ जून रोजी मुंबईत अटक करण्यात आली होती.
हेही वाचा >>>पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रवादीवर ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, शरद पवार म्हणाले, “फडणवीस…”
पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने राहुलला याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. राहुलने गुन्ह्यासाठी आणखी दोन शर्ट वापरले होते. ते अद्याप जप्त करण्यात आलेले नाहीत. तसेच खून करून तो काही दिवस फरार झाला होता. फरार असताना त्याला कोणी मदत केली आहे का? तो नेमका कोणत्या ठिकाणी राहिला, याची माहिती अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. त्यावर आरोपीच्यावतीने ॲड. गणेश माने यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नसून न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तिवाद ॲड. माने यांनी केला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असे नमूद करीत न्यायालयाने राहुलच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे.